konkan | Sarkarnama

कोकणच्या सिंचनासाठी लवकरच विशेष पॅकेज

कुणाल जाधव : सरकारनामा न्यूजब्युरो
गुरुवार, 9 मार्च 2017

मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोकणातील सिंचनासाठी विशेष पॅकेज देण्याचे आश्‍वासन देण्यात आल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे.

मुंबई : अधिवेशनादरम्यान पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोकणातील सिंचनासाठी विशेष पॅकेज देण्याचे आश्‍वासन देण्यात आल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे. या बैठकीत कोकणातील सिंचनावरुन शिवसेनेचे एक मंत्री भलतेच आक्रमक झाले होते. त्यामुळे नाइलाजाने संबंधित खात्याच्या मंत्र्यांना आश्‍वासन द्यावे लागल्याची चर्चा आहे. येत्या महिन्याभरात या पॅकेजची अधिकृत घोषणा होण्याची शक्‍यता आहे.

सिंचनाच्या मुद्यावर कोकणाला डावलले जात असल्याचा आरोप करत मंत्रिमंडळ बैठकीत सेनेचे कोकणातील एक मंत्री आक्रमक झाले. "विदर्भ, मराठवाडा, खान्देश, पश्‍चिम महाराष्ट्र याठिकाणी सिंचन 4 टक्के आहे. या प्रदेशांमध्ये सिंचनाचा टक्का वाढविण्यासठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली जाते. मात्र, कोकणात 40 टक्के पाऊस पडूनही सिंचन केवळ एक टक्का आहे, तिथला टक्का वाढविण्यासाठी सरकारी पातळीवर विशेष प्रयत्न केले जात नाहीत, या अशा शब्दांत सेनेच्या या मंत्र्याने आपले मत बैठकीत मांडले. कोकणातील सिंचनासाठी सरकारने पॅकेज जाहीर करावे, या मागणीसाठी हे मंत्री महोदय भलतेच संतापले. मंत्र्याच्या या वक्तव्यानंतर लवकरच कोकणातील सिंचनासाठी सुमारे 350 कोटींचे पॅकेज जाहीर करण्याचे आश्‍वासन संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी दिले. तसेच कोकणातील पाटबंधारे प्रकल्पांनाही गती देण्याचे आश्‍वासन यावेळी देण्यात आले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख