कोल्हापुरातील मतांचा काटा कोणाकडे झुकणार, यावर पदवीधरचा निकाल ठरणार - who will get response in Kolhapur for MLC voting is the key of victory | Politics Marathi News - Sarkarnama

कोल्हापुरातील मतांचा काटा कोणाकडे झुकणार, यावर पदवीधरचा निकाल ठरणार

सुनील पाटील
बुधवार, 2 डिसेंबर 2020

मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. कोल्हापुरात प्रचंड मतदान झाल्याने अनेकांना येथील मतांचा अंदाज येत नाही. 

कोल्हापूर : पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी कधी नव्हे तो पक्षीय पातळीवर झालेला संघर्ष, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी तसेच जे कोणत्याही पक्षाशी बांधितल नाहीत पण वैयक्तिकरित्या मतदान नोंदणीसाठी आणि मतदान करण्यासाठी उर्त्स्फुतपणे बाहेर पडलेल्या मतदारांमुळे कोल्हापूर जिल्ह्यात मतदानाचा टक्का प्रचंड वाढला.

कोल्हापूर जिल्ह्यात पदवीधर मतदार संघासाठी 68.09 टक्के तर, शिक्षक मतदार संघासाठी 86.09 टकके मतदान झाले आहे. वाढलेल्या मतदानामध्ये पक्षीय पातळीवरील उमेदवारांना जसे मतदान झाले असेल तसेच अपक्ष उमेदवारांनीही मत मिळविण्याचा चांगला पल्ला गाठलेला दिसण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. पुण्यात सुमारे 61 हजार तर कोल्हापुरात 60 हजार मतदान झाले आहे. त्यामुळे या मतांचा काटा कोणाकडे सरकणार, याची उत्सुकता आहे. 

पुणे पदवीधरमधून राष्ट्रवादीचे अरुण लाड, भाजपचे संग्राम देशमुख, मनसेच्या रुपाली पाटील, अपक्ष व ज्यांनी संभाजी ब्रिगेडचा खंदा उमेदवार म्हणून प्रचार केला ते डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली. तर, शिक्षक संघातून कॉंग्रेच्या तिकटावर जयंत आसगावर, भाजपकडून जितेंद्र पवार, विद्यमान आमदार दत्ता पाटील व शरद पाटील यांनी मतदारांपर्यंत पोचण्याचा जोरदार प्रयत्न केला. 

कोल्हापूर जिल्ह्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या पदवीधर व शिक्षक मतदार संघातील उमेदवारांचा सांघिक प्रचार सुरु ठेवला. यामध्ये ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रतिस्पर्धी भाजपच्या उमेदवाराचा प्रचारार्थ पुढाकार घेतलेल्या चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ले चढवले.

चंद्रकांत पाटील यांनी याला उत्तर देत कोल्हापूर जिल्ह्यात भाजपच्या दोन्ही उमेदवारांना जास्त मते मिळावीत यासाठी प्रयत्न केला. या तिन्ही दिग्गजांनी एकमेकांना पुरून उरेल अशा टिकास्त्र साडले. मनसेच्या रुपाली पाटील यांनीही सोशलमिडियाद्वारे कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारांपर्यंत आपला अजेंडा पोचवला.

दरम्यान, डॉ. श्रीमंत कोकाटे हे संभाजी ब्रिगेडचे खंदे उमेदवार म्हणून मतदारांसमोर आले. आरएसएस, भाजपच्या धोरणावर आणि नितीवर जोरदार टिका आणि विरोध करणारे म्हणून बहुसंख्य पदवीधर मतदारांनी श्री कोकाटे यांना पसंती दिल्याचे चित्र आहे. तसेच, जे पदवीधर कोणत्याही पक्षाशी बांधिल नाही असे मतदार इतिहास तंज्ञ म्हणून कोकाटे यांच्याकडे वळतील, असेही चित्र आहे. दरम्यान, संभाजी ब्रिगेड पक्षाचे अधिकृत उमेदवार हे मनोजकुमार गायकवाड आहेत. तर काहीजण संभाजी ब्रिगेडचा गैरवापर करत असल्याचे सांगत, संभाजी ब्रिगडेच्या कार्यकर्त्यांनीही त्यांच्या उमेदवाराचा चांगला प्रचार केला. त्यामुळे, कोल्हापूर जिल्ह्यात चुरसीने झालेल्या मतदानामध्ये कोण बाजी मारणार? कोणाचा अपेक्षाभंग होणार? आणि कोणाचे वचन पूर्ण होणार हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख