सलग 46 वर्षे संचालक असलेले अरुण नरके पहिल्यांदाच 'गोकुळ'च्या रिंगणाबाहेर - senior director arun narke will not contest gokul election | Politics Marathi News - Sarkarnama

सलग 46 वर्षे संचालक असलेले अरुण नरके पहिल्यांदाच 'गोकुळ'च्या रिंगणाबाहेर

सुनील पाटील
बुधवार, 7 एप्रिल 2021

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) सलग नऊ निवडणुका लढवून त्या जिंकलेले ज्येष्ठ संचालक अरुण नरके यंदा पहिल्यांदाच संघाच्या निवडणूक रिंगणातून बाहेर पडले.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) ज्येष्ठ संचालक अरुण नरके यंदा पहिल्यांदाच संघाच्या निवडणूक रिंगणातून बाहेर पडले आहेत. सलग नऊ निवडणुका लढवून त्या जिंकलेले व सलग 46 वर्षे संचालक असलेले नरके यांनी घेतलेल्या माघारीने मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. नरके यांच्यासह त्यांच्या स्नुषा स्निग्धा चेतन नरके यांनीही आज माघार घेतली. नरके हे आता पुत्र चेतन यांच्यासाठी प्रयत्नशील आहेत. 

'गोकुळ'च्या निवडणुकीतील दाखल उमेदवारी अर्जांच्या छाननीची प्रक्रिया काल (ता. 6) पूर्ण झाली. कालपासून उमेदवारी अर्जांची माघार घेण्यास सुरवात झाली. आज पहिल्याच दिवशी अरुण नरके यांच्यासह दोघांनी अर्ज मागे घेतला. अर्ज माघारीचा 20 एप्रिल हा अखेरचा दिवस असून, त्याच दिवशी संघातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. 'गोकुळ'ची स्थापना झाल्यानंतर संस्थापक आनंदराव पाटील-चुयेकर यांच्यासह नरके हे 1977 पर्यंत शासन नियुक्त संचालक मंडळावर कार्यरत होते. त्यानंतर झालेल्या नऊ निवडणुका त्यांनी लढविल्या आणि त्या जिंकल्याही. पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीनंतरच्या पहिल्याच वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांनी यापुढे संघात नसणार, असे जाहीर केले होते. उत्तराधिकारी म्हणून पुत्र चेतन यांना संधी देण्याची घोषणाही त्यांनी केली होती. 

'गोकुळ'च्या 46 वर्षांच्या संचालकपदाच्या काळात नरके सलग 27 वर्षे राष्ट्रीय पातळीवरील इंडियन डेअरी बोर्डाचे संचालक, तर सलग तीन वर्षे अध्यक्ष होते. तसेच, त्यांच्या कारकीर्दीतच 'गोकुळ'ला खऱ्या अर्थाने वैभव प्राप्त झाले होते. दुग्ध क्षेत्रातील वर्गिस कुरियन पुरस्कार मिळवणारे नरके हे महाराष्ट्रातील एकमेव संचालक आहेत. त्यांच्या काळात अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने 'गोकुळ'चा सन्मान झाला. 

'गोकुळ'च्या इतिहासात सर्वाधिक आणि सलग दहा वर्षे अध्यक्ष राहण्याचा बहुमानही नरके यांच्या नावावर आहे. ते 3 डिसेंबर 1990 ते 13 डिसेंबर 2000 या काळात अध्यक्ष होते. याच काळात 'गोकुळ'ला राज्य आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचविण्यात त्यांचा मोठा सहभाग राहिला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख