.. आता पालकमंत्री सतेज पाटलांनी उचलला हा विडा! - satej patil ready to take responsibility of one MLC constituency in Pune divison | Politics Marathi News - Sarkarnama

.. आता पालकमंत्री सतेज पाटलांनी उचलला हा विडा!

सुनील पाटील
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

पुणे पदवीधरमधील निवडणूक ही राष्ट्रवादी विरुद्ध भाजप होण्याची शक्यता आहे. 

कोल्हापूर : पुणे पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघापैकी कोणतीही एक जागा काँग्रेसला द्यावी, ती जागा निवडून आणण्याची जवाबदारी आपली राहील, अशी ग्वाही कोल्हापूरचे पालकमंत्री आणि गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज दिली.

भाजपच्या शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात ट्रॅक्टर रॅलीनंतर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते . पाटील म्हणाले, पुणे पदवीधर तसेच शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यासाठी काँग्रेसच्या वतीने मोठ्या प्रमानात नोंदणी झाली आहे. पुणे विभागातील कोणताही एक मतदारसंघ काँग्रेसला द्या. तेथील उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी माझी राहील. या निमित्ताने विधान परिषदेमध्ये काँग्रेसचा आणखीन एक उमेदवार निवडून येईल. त्यामुळे काँग्रेसचे संख्या बाळ  निश्चितच वाढेल.

पाटील यांनी हे भाषण हिंदितून केले. `उमेदवार जिताने की जिम्मेदारी मेरी रहेगी'' असे त्यांनी काँग्रेसचे राज्याचे प्रभारी एच के पाटील यांना अश्वस्त केले .पुणे पदवीधरची जागा राष्टवादी काँग्रेसच्या वाट्याला जाणार असल्याने किमान शिक्षक  मतदारसंघाची जागा तरी काँग्रेसला मिळावी, यासाठी हे आवाहन महत्वाचे समजले जाते.

पुणे पदवीधरमधील निवडणूक ही राष्ट्रवादी विरुद्ध भाजप होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस या  तीनही पक्षांचे विधान परिषद निवडणुकीबाबत अद्याप धोरण जाहीर झालेले नाही. तसेच पुणे, औरंगाबाद आणि नागपूर येथील पदवीधर मतदारसंघाचे वाटपही अद्याप ठरलेले नाही. याशिवाय पुणे आणि अमरावती येथील शिक्षक मतदारसंघातील निवडणुका होणार आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर भाजपच्या विरोधात तीन पक्षांची ही एकत्रित निवडणूक असेल. त्यातही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा जुना मतदारसंघ असलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख