पवार साहेबांचा फोन आला, म्हणून माघार घेतली... - Pawar's phone rang, so he withdrew | Politics Marathi News - Sarkarnama

पवार साहेबांचा फोन आला, म्हणून माघार घेतली...

ओंकार धर्माधिकारी
रविवार, 15 नोव्हेंबर 2020

शरद पवार व हसन मुश्रीफ यांचा शब्द कधीच डावलू शकत नाही. त्यांच्या शब्दाला मान देऊन उमेदवारी अर्ज मागे घेणार आहे.  पूर्ण ताकदीने अरुण लाड यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही माने यांनी यावेळी सांगितले.

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा मला फोन आला, त्यांनी माघार घ्या अशी सूचना केली. त्यांच्या शब्दाला मान देऊन पदवीधर निवडणुकीतील उमेदवारी मागे घेणार आहे, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भय्या उर्फ प्रताप माने यांनी पत्रकार परिषदेत दिले. पक्षाचे उमेदवार अरुण लाड यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

भय्या माने यांनी पुणे पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून अरुण लाड यांची निवड केली गेली. दोन दिवसापूर्वी लाड यांनी माने यांची भेट घेऊन अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, अशी विनंती केली होती. कार्यकर्त्यांशी संवाद साधून मग निर्णय घेऊ. असे माने यांनी सांगितले. त्याप्रमाणे आज (ता.१५) जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या सभागृहात कार्यकर्ता मेळावा झाला.

त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन माने यांनी उमेदवारी मागे घेणार असल्याचे जाहीर केले. यावेळी माने म्हणाले, 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला मोठे केले, प्रदेशाचा उपाध्यक्ष म्हणून मी काम केले.  शिवाजी विद्यापीठाचा अधिसभा सदस्य आहे. गेल्या सहा विधानसभा निवडणुकीमध्ये व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये निष्ठेने काम करून पक्षाला विजयी केले. मला पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी मिळेल अशी आशा होती. त्यामुळे अपक्ष अर्ज दाखल केला.

मात्र पक्षाने अरुण लाड यांना उमेदवारी दिली. त्यानंतर पवार साहेबांचा मला फोन आला. तुम्ही उमेदवारी मागे घ्या, अशी सूचना त्यांनी केली. राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांचाही ह्याबाबत फोन आला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माघार घ्या असे सांगितले. शरद पवार व हसन मुश्रीफ यांचा शब्द कधीच डावलू शकत नाही. त्यांच्या शब्दाला मान देऊन उमेदवारी अर्ज मागे घेणार आहे.  पूर्ण ताकदीने अरुण लाड यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही माने यांनी यावेळी सांगितले.

पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील, जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, नावेद मुश्रीफ, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राजेश लाटकर, आदिल फरास, अनिल साळोखे, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

महाविकास आघाडी घेणार मेळावा

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, महाविकासआघाडी मेळावा घेणार आहे. शुक्रवारी (ता.२०) महासैनिक दरबार हॉल येथे हा मेळावा होईल. अर्थमंत्री जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती यावेळी असणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी दिली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख