Kolhapur Politics : कोल्हापुरात खऱ्या अर्थानं भाजप - शिंदे गट एकत्र येणार का ?

Kolhapur Politics : राज्यातील सत्तांतरानंतरही कोल्हापुरात महाविकास आघाडीत एकजूट...
Dhananjay Mahadik, Sanjay  Mandlik
Dhananjay Mahadik, Sanjay MandlikSarkarnama

Kolhapur Politics News :कोल्हापूरचे राजकारण हे राज्याच्या राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. काँग्रेसचे सतेज पाटील, राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ,भाजपचे धनंजय महाडिक, शिंदे गटाचे संजय मंडलिक, शिंदे गटाचे धैर्यशील माने यांच्यासह ठाकरे गटाचे संजय पवार यांसारख्या मातब्बर नेतेमंडळी एकमेकांना शह प्रतिशह तसेच कुरघोडीचं राजकारण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात.

मात्र, राज्यातील सत्तांतरानंतरही महाविकास आघाडीत एकजूट राखली असतानाच राज्यात सत्तेत एकत्र नांदत असलेल्या भाजप (Bjp) शिंदे गटात अद्यापही मनोमिलन झालेलं नसल्याचं चित्र समोर आलं आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Dhananjay Mahadik, Sanjay  Mandlik
Mahavitaran News : शिंदे-फडणवीस सरकार देणार जनतेला 'या' दरवाढीचा 'शॉक'?

एकीकडे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सतेज पाटलांनी धनंजय महाडिकांना चांगलाच धोबीपछाड देताना काँग्रेसचे तब्बल सहा आमदार निवडून आणले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसची पाच आमदारांवरुन दोन आमदारांवर घसरण झाली होती. तर शिवसेनेचा एक आमदार निवडून आला होता.

२०१४ च्या मोदी लाटेत सपाटून मार खाललेल्या काँग्रेसच्या सतेज पाटलांना (Satej Patil) २०१९ च्या विधानसभेतील प्रचंड यशामुळे मोठं बळ मिळालं होतं. तसेच पुन्हा एकदा कोल्हापूरच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण करण्यात यश आलं होतं. त्यात २०१९ रोजी राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यामुळे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेला स्थानिक पातळीवर चांगलंच बळ मिळालं होतं.

Dhananjay Mahadik, Sanjay  Mandlik
Eknath Shinde News : शरद पवारांच्या टीकेवर मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सडेतोड उत्तर..

मात्र, जून महिन्यांत राज्यसभा निवडणूक व विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला होता. उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वालाच आव्हान देत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि ४० आमदारांनी व १२ खासदारांनी ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आणि त्यामुळे उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. आणि महाविकास आघाडी सरकारला सत्तेतून पायउतार व्हावे लागले.

राज्यातील सत्तांतरामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडी बॅकफूटवर गेली असून शिंदे गटाच्या साहाय्याने भाजप कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. पण स्थानिक पातळीवर राज्यातील सत्ताकारणाची समीकरणं कितपत लागू होतात हा प्रश्न कायमच उपस्थित होत आला आहे.

लोकसभेच्या २०१४ रोजीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून धनंजय महाडिक तर शिवसेनेकडून संजय मंडलिक यांनी निवडणूक लढविली होती.यात महाडिकांना पराभवाचा धक्का देत मंडलिकांनी शिवसेनेचा भगवा कोल्हापूर लोकसभेवर फडकवला होता. मात्र, यानंतर राज्याच्या राजकारणात बरेच पुलाखालून पाणी वाहून गेले आहे.

धनंजय महाडिकांनी संधीचं सोनं करत राज्यसभेची निवडणुकीत आपली सर्व ताकद पणाला लावत शिवसेनेचे उमेदवार संजय पवारांना पराभवाचा धक्का देत खासदारकी अक्षरश: खेचून आणली होती. आता कोल्हापूरमध्ये शिंदे गटाचे दोन खासदार आहे. राज्यसभेतील विजयामुळे पुन्हा एकदा महाडिक कोल्हापूरच्या राजकारणात सक्रिय झाले आहे. तसेच भाजपनं देखील महाडिकांच्या रुपानं राष्ट्रवादी, काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात आपलं अस्तित्व आणि आव्हान निर्माण करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहे.

शिंदे फडणवीस सरकारकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने चाचपणी सुरु आहे. लवकरच काही महिन्यांपासून रखडलेल्या या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये कोल्हापूरच्या राजकारणात एकजूट कायम राखलेल्या महाविकास आघाडीविरोधात अद्यापही शिंदे गट आणि भाजप मनोमिलन झालेलं नसताना कसं आव्हान निर्माण करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com