पूणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघांसाठी कॉंग्रेस इच्छुकांच्या कोल्हापूरमध्ये जोरदार मुलाखती  - interviews in Kolhapur of Congress aspirants for Pune graduates, teacher constituencies | Politics Marathi News - Sarkarnama

पूणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघांसाठी कॉंग्रेस इच्छुकांच्या कोल्हापूरमध्ये जोरदार मुलाखती 

सुनील पाटील
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

इच्छुक उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह दुपारपासूनच कॉंग्रेस कमिटीच्या कार्यालयात गर्दी केली होती.

कोल्हापूर : राज्यातील विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणूक महाविकास आघाडीच्यावतीने एकत्रित लढविली जाणार आहे. पुणे मतदारसंघातील कॉंग्रेसकडून शिक्षक मतदारसंघासाठी 11 इच्छुकांनी तर पदवीधरसाठी तीन इच्छुकांनी आज मुलाखत दिली.

कोल्हापूर शहर कॉंग्रेस कमिटीमध्ये कॉंग्रेसचे राज्याचे प्रभारी एच. के. पाटील यांनी या मुलाखत घेतल्या. यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री व कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील, सहकार, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, निरिक्षक सोनल पटेल व मोहन जोशी उपस्थित होते. 

पुणे शिक्षक मतदारसंघातून 11 जण इच्छुक आहेत. यामध्ये, कोल्हापुरातील कर्णसिंह सरनोबत, भरत रसाळे, रेखा पाटील, दादासो लाड, बाबासाहेब पाटील, जयंत आसगावकर, तानाजी नाईक, जत मधील सुजाता चौखंडे माळी, शिरोळ मधील खंडेराव जगदाळे, पुणे येथील जी. के. थोरात व प्रकाश पाटील यांचा समावेश आहे. तर पुणे पदवीधरसाठी कोल्हापुरातील भरत रसाळे, इचलकरंजीतील शशांक बावचकर तर पुणे येथील डॉ. राजेंद्र खेडेकर यांचा समावेश आहे. 

राज्यात सत्ता असलेल्या महाविकास आघाडीच्यावतीने विधानपरिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदार संघाची निवडणुक एकत्रित लढवण्याचा निर्णय घेतला आहे. कॉंग्रेस पक्षाच्यावतीनं ही निवडणुक लढवण्यासाठी दोन्ही मतदारसंघातील इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या सर्व उमेदवारांच्या मुलाखती आज दुपारी कोल्हापूर शहर कॉंग्रेस कमिटीच्या कार्यालयात पारदर्शक पद्धतीने झाल्या. इच्छुक उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह दुपारपासूनच कॉंग्रेस कमिटीच्या कार्यालयात गर्दी केली होती. आपल्याच नेत्याला उमेदवारी मिळावी यासाठी समर्थक घोषणाबाजी करत जोरदार शक्तीप्रदर्शन करत होते. मुलाखतीनंतर दोन्ही मतदारसंघासाठी योग्य उमेदवारी कोणाला द्यायची याबातचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. त्यामुळं उमेदवारी कोणाला मिळणार याची धाकधुक इच्छुकांसह समर्थकांना लागली आहे.

यावेळी महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार पी. एन. पाटील, चंद्रकांत जाधव, ऋतूराज पाटील, राजूबाबा आवळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, दिनकरराव जाधव, देविदास बन्साळी, संदीप कुमार, सरलाताई पाटील यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख