पवारांच्या एकेका वाक्‍यावर फिरला कोल्हापुरात लोकसभेचा निकाल : पार्थविषयीच्या वक्तव्यामुळे पुन्हा चर्चा

आपला नातू पार्थ पवार याला शरद पवार यांनी फटकारल्यानंतर पवारांनी या आधी असे कोणाला फटकारले होते, याच्या आठवणी रंगू लागल्या आहेत.
sharad pawar speech in rain
sharad pawar speech in rain

कोल्हापूर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी कृषी मंत्री शरद पवार एखाद्या सभेत असो किंवा पत्रकार परिषदेत काय बोलतील आणि कोणाची फिरकी घेतील याचा काही नेम नसतो. उपमुख्यंमत्री अजित पवार यांचे पुत्र व श्री. पवार यांचे नातू हा इम्यॅच्युर आहे, त्याच्या बोलण्याला मी कवडीची किंमत देत नाही असे म्हणत त्यांनी काल खळबळ उडवून दिली असताना कोल्हापुरातही केलेल्या काही टिकांची या निमित्ताने आठवण होत आहे.


लोकसभेची 2004 ची निवडणूक त्यावेळचे राष्ट्रवादीचे उमेदवार कै. सदाशिवराव मंडलिक विरूध्द शिवसेनेचे उमेदवार माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यात झाली. श्री. महाडिक हे कोल्हापुरात "मुन्ना' या टोपण नावाने ओळखले जातात. त्यांनी अवघ्या पंधरा दिवसांत राष्ट्रवादीच्या नेत्यांना जिल्ह्यात घाम फोडला होता. आताचे गृहराज्यमंत्री व पालकमंत्री सतेज पाटील यांनीही लपतछपत त्यावेळी श्री. महाडिक यांच्या मागेच आपली ताकद लावली होती. याशिवाय "शाहू-कागल' चे संस्थापक कै. विक्रमसिंह घाटगे यांनी तर श्री. महाडिक यांना उमेदवारी मिळवून देण्यापासून ते त्यांच्या प्रचारातही सक्रिय सहभाग घेतला होता. कै. मंडलिक यांच्या प्रचारार्थ त्यावेळी बिंदू चौकात सभा होती, सभेतील श्री. पवार यांचे भाषण फारसे उठावदार झाले नाही, पण भाषणाच्या शेवटी "कोण है ये मुन्ना, कहांसे आया' एवढेच वाक्‍य उच्चारले आणि या वाक्‍यावर निवडणुकीचा निकालच त्यांनी फिरवून टाकला.

या निवडणुकीत कै. मंडलिक अवघ्या 14 हजार मतांनी विजयी झाले. काळाच्या ओघात श्री. महाडिक हे राष्ट्रवादीत आले आणि त्यानंतर 2014 च्या निवडणुकीत ते राष्ट्रवादीचे खासदार म्हणून विजयीही झाले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत श्री. महाडिक यांच्या प्रचारार्थ गांधीमैदान येथे झालेल्या सभेत शिवसेनेचे खासदार प्रा. संजय मंडलिक यांचा समाचार घेताना "हे महाशय रात्री-अपरात्री असतात कोठे, काय करतात ते पहा आणि महाडिक हे खणखणीत नाणे आहे' असे म्हटले होते.

2009 च्या निवडणुकीत कै. मंडलिक यांना डावलून श्री. पवार यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी दिली. ना निर्णय न रूचल्याने कै. मंडलिक यांनी सर्वांचा विरोध डावलून अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली. या निवडणुकीत जनमत कै. मंडलिक यांच्या बाजूने दिसत होते, पण कोरी पाटी, राज घराण्याचा वारसा आणि शांत संयमी उमेदवार म्हणून संभाजीराजे यांचा सहज विजय होईल, असेही वाटत होते. त्यावेळी दोन्ही कॉंग्रेसची मातब्बर मंडळी संभाजीराजे यांच्या प्रचारार्थ रिंगणात उतरली होती. त्यांच्या प्रचारार्थ महाराणा प्रताप चौकात श्री.पवार यांची सभा झाली. या सभेच्या सुरूवातीच्या भाषणात नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांनी कै. मंडलिक यांच्यावर कोणतीही टिका करू नका असे आपल्या भाषणात स्पष्टपणे श्री. पवार यांना उद्देशून सांगितले होते, पण तरीही श्री. पवार यांनी कै. मंडलिक यांच्यावर टीका करताना "बैल म्हातारा झाला की, त्याला बदलावा लागतो' अशा शब्दात कै. मंडलिक यांच्यावर निशाणा साधला. हे विधान अंगलट आले. दुसऱ्या दिवशी राधानगरी तालुक्‍यातील अनेक गावांत लोकांनी म्हाताऱ्या बैलांच्या मिरवणुका काढला. या निवडणुकीत कै. मंडलिक यांनी बाजी मारून राज्याच्या आणि देशाच्या राजकारणातही एकच धक्का दिला.

लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून मुन्ना महाडिक हे उमेदवार होते. त्यांच्याविरोधात शिवसेनेचे संजय महाडिक यांचा सामना होता. मंडलिक यांना राष्ट्रवादीच्या नाराज मंडळींचा आणि काॅंग्रेस नेत्यांचा पाठिंबा होता. मंडलिक यांच्या या छुप्या समर्थकांनी `आमचं ठरलयं`, असे फलक शहरभर लावले होते. पवारांनी सभेच्या दिवशी हे फलक पाहिले. सभेत त्याचा उल्लेख करताना तुमंच ठरलयं तर मी बी ध्यानात ठेवलयं, अशा शब्दांत मंडलिकांना पाठिंबा देणाऱ्यांना इशारा दिला होता. पण `आमचं ठरलयं`वाल्यांचा विजय झाला.  

कोल्हापुरच्या दौऱ्यात त्यांनी अनेकदा अनुभवी पत्रकारांचीही फिरकी घेतल्याच्या आठवणी आहेत. श्री. पवार हे केंद्रात मंत्री तर राज्यात गृहमंत्री म्हणून जयंत पाटील कार्यरत होते, त्या काळात सांगलीतील एका पोलिस निरीक्षकाच्या वादग्रस्त बदलीची राज्यभर चर्चा सुरू होती, त्याच दरम्यान कोल्हापुरात आलेल्या श्री. पवार यांना पत्रकार परिषदेच्या सुरूवातीलाच यासंदर्भात प्रश्‍न विचारताच त्यांनी चिडूनच "कोणाला काय विचारायचे याचे तारतम्य ठेवा, मी राज्याच्या राजकारणात लक्ष घालत नाही' असे सांगत आपला राग व्यक्त केला. त्यानंतर या पत्रकार परिषदेचा रंगच पालटला. अशाच एका कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने कांद्याच्या दराविषयी प्रश्‍न विचारला, त्यावेळी श्री. पवार केंद्रीय कृषी मंत्री होते, त्यांनी तुम्हीच सांगा पुर्वी कांद्याचा दर किती होता असा प्रतिप्रश्‍न करून त्या पत्रकाराला निरूत्तर केले होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर ते महान आहेत, त्यांना मोठा जनाधार आहे, अशा शब्दांत कोल्हापुरात समाचार घेतला होता.

1989 नंतर श्री. पवार हे 2018 मध्ये पहिल्यांदा रेल्वेने सौ. प्रतिभा पवार यांच्यासह मुंबईला निघाले होते, रेल्वेस्टेशनवर त्यांना निरोप देण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांसह काही पत्रकारही उपस्थित होते, त्यावेळी एका पत्रकारांनी "तुम्ही रेल्वेने किती वर्षानंतर मुंबईला चालला' असे विचारताच "हे मलाच आठवत नाही' असे प्रत्युत्तर देऊन सगळ्यांना हसवले होते. कोल्हापुरशी संबंधित अशी अनेक वाक्‍य श्री. पवार यांच्याविषयी आठवल्याशिवाय रहात नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com