कोल्हापूरात नगरसेवक पदाचे शेवटचे तीन दिवस... कादंबरी बलकवडेंची प्रशासकपदी नियुक्ती - govt appoints Kadambari Balkawade as administrator in Kolhapur Corporation | Politics Marathi News - Sarkarnama

कोल्हापूरात नगरसेवक पदाचे शेवटचे तीन दिवस... कादंबरी बलकवडेंची प्रशासकपदी नियुक्ती

सुनील पाटील
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

विद्यमान पदाधिकाऱ्यांची अनौपचारीक सल्लागार समिती नेमण्यात आली आहे. या समितीने पंधरा दिवसांतून एकदा ऑनलाईन बैठक घ्यावी. यामध्ये कोरोना उपाय योजनेसंदर्भात चर्चा करावी, अशा सूचना आदेशामध्ये आहेत.

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या विद्यमान सभागृहाची मुदत 15नोंव्हेंबरला संपणार असल्याने आणि कोरोना संकटामुळे महापालिकेची निवडणूक लांबणीवर गेल्याने उर्वरित काळात महापालिकेवर प्रशासक नियुक्त केला असून महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांची प्रशासक म्हणून राज्यशासनाने नियुक्ती केली आहे. दोनच दिवसापुर्वी यासंदर्भातील अध्यादेश काढण्यात आला.

दरम्यान कोरोनाला रोखण्यासाठीच्या मोहिमेमध्ये पदाधिकाऱ्यांनी सल्लागार म्हणून काम करायचे आहे. दर पंधरा दिवसांनी त्यांची बैठक होणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे लांबणीवर पडलेली महापालिकेची निवडणूक आणखीन सहा महिने तरी होणार नाही, असे चित्र आहे.त्यामुळे प्रशासक म्हणून डॉ.कादंबरी बलकवडे यांना सहा महिने काम करण्याची संधी मिळणार आहे. 15 नोंव्हेबंरपासून आयुक्त कादंबरी बलकवडे या प्रशासक म्हणून काम पाहणार आहेत.

 
नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी हा आदेश काढला असून या आदेशामध्ये म्हटले आहे की, कोरोनामुळे राज्य निवडणूक आयोगाने मुदत संपणाय्रा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक स्थगित केल्या आहेत. यामुळे अशा संस्थांच्या निवडणूकीसाठी आणखीन कालावधी लागणार आहे. विद्यमान सभागृहालाही मुदतवाढ देता येत नाही. त्यामुळे 15 नोव्हेंबरपासून महापालिकेवर प्रशासक म्हणून आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांची नियुक्ती केली जात आहे. नगरसेवकांची मुदत संपताच त्यांनी प्रशासक म्हणून कार्यभार स्वीकारावा, असेही म्हटले आहे.

दरम्यान,कोरोनामुळे उद्भवलेल्या आरोग्य विषयक आपत्कालिन परिस्थिती, लोकांचा सहभाग विचारात घेता प्रशासनाच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने अनौपचारिकरित्या विद्यमान महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेते, सर्व गटनेते यांची सल्लागार समिती असावी. त्यांच्याशी सल्लामसलत करावी. महापालिकेचे कामकाज सुयोग्य व लोकाभिमुख व्हावे या दृष्टीकोनातून मदत करण्यासाठी अनौपचारीक सल्लागार समिती यांची पंधरा दिवसांतून एकदा ऑनलाईन बैठक घ्यावी. यामध्ये कोरोना उपाय योजनेसंदर्भात चर्चा करावी, अशा सूचना आदेशामध्ये केल्या आहेत.

प्रशासकराजमुळे महापालिकेतील नगरसेवकांचे अधिकार संपुष्ठात आले आहेत. नगरसेवक म्हणजे प्रभागातील समस्या सांगण्यासाठीचा हक्काचा माणूंस असतो. प्रशासकराजमुळे नागरीकांना त्यांच्याकडे प्रभागातील तक्रारी सांगण्यास मर्यादा आल्या आहेत. यावर पर्याय म्हणजे महापालिका संदर्भातील तक्रार नोंदवण्यासाठीचा 1800231913 हा टोल फ्री क्रमांक आहे. नवीन सभागृह अस्तित्वात येईपर्यंत यामाध्यमातून तक्रारी निरसन करता येणार आहे. आयुक्त डॉ. बलकवडे यांनीही यावरील तक्रारींची गंभीर दखल घेतली जाईल,असे स्पष्ट केले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख