
कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळाचे काम गेल्या अडीच वर्षात का झालं नाही, असा प्रश्न करून मी सत्ताधारी पक्षाचा खासदार असल्याने हे काम मंजूर करून आणलं आहे. माजी मंत्री व पालकमंत्र्यांनी काही खासदारांची नावं घेतली. त्यांनी माझंही नाव घ्यायला पाहिजे होते, असे सांगून श्रेयवादाचा मुद्दा नाही, पण, कोल्हपूरचे प्रश्न सुटावेत, मार्गी लागावेत हा विषय आहे, असे स्पष्ट मत भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केले.
विमानतळासह विविध प्रश्नावर खासदार महाडिक यांनी भाष्य करताना विरोधकांना कानपिचक्या दिल्या. खासदार महाडिक म्हणाले, कोल्हापूर विमानतळाचा प्रश्न गेली तीन, चार वर्षे प्रलंबित होता. मुळात हे विमानतळ मी खासदार झाल्यापासून सुरू झाले. त्यानंतर १५ वर्षे काम बंद होते. त्यानंतर मी २७४ कोटींचा निधी लावला. त्यानंतर पाच प्रकारच्या विमानसेवा सुरू केल्या. नाईट लॅडिंग, ॲपरन, टॅक्सी वे हे प्रश्न आहेत.
आता मी तीन महिन्यांपूर्वी खासदार झालो आहे. त्यामुळे या विमानतळाचा विषय घेऊन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना पत्र देऊन मंजूरी करून घेतली. पण, माजी मंत्री व पालकमंत्र्यांनी हे काम आम्हीच केलंय असे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांनी काही खासदारांची ही नावं घेतली. पण, त्यांनी माझं ही नाव घ्यायला पाहिजे होते. कारण यामध्ये माझंही योगदान होतं. त्यांनी नाव घेतलं असता तर बरं वाटलं असता, असे त्यांनी नमुद केले.
मी पाठपुरावा केला होता, यामध्ये श्रेयवादाचा मुद्दा नाही, कोल्हापूरचे प्रश्न सुटावेत, मार्गी लागावेत हा विषय आहे. मी सत्ताधारी पक्षाचा खासदार असल्याने त्याला त्वरीत न्याय देऊ शकलो. गेली अडीच वर्षे ते मंत्री होते, मग विमानतळाचं काम का झालं नाही, असा प्रश्न त्यांन उपस्थित केला. गेली अडीच वर्षे ज्या लोकांनी आमच्याशी फारकत घेतली होती. ते सर्वजण आता मी खासदार झालो, त्यानंतर राज्यात शिंदे, फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर फारकत घेऊन असलेले अनेकजण भेटून जात आहेत. काही लोक पक्ष प्रवेश करणार आहेत. आगामी काळात जिल्ह्यातील प्रमुख संस्थांत भाजपच्या विचारांचे लोक निवडून येतील, असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला.
मी रणांगणातच....
काही लोकांनी गैरसमज करून घेतला होता, २०१९ मध्ये पराभूत झाल्याने यापुढे महाडिकांना गुलाल लागणार नाही. महाडिकांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण, महाडिक परिवाराला चंद्रकांत दादा व देवेंद्र फडणवीसांनी कोल्हापूरला संधी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांत चैतन्याची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे महाडिकांना गुलाल लागणार नाही, असे म्हणणाऱ्यांना आता कळाले की गुलाल लागला. काहींना आम्ही स्पर्धेतून बाहेर गेलो असे वाटत होते. पण, आम्ही रणांगणातून बाहेर आहे की नाही हे आगामी निवडणूकात चित्र स्पष्ट होईल.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.