हे तर पहिल्यांदाच : मूळ संघाचा नसलेला भाजपचा उमेदवार! एकाच तालुक्यातील दोन मित्रांत लढत!! - bjp gives ticket first time in Pune graduate constituency who does not belong to RSS | Politics Marathi News - Sarkarnama

हे तर पहिल्यांदाच : मूळ संघाचा नसलेला भाजपचा उमेदवार! एकाच तालुक्यातील दोन मित्रांत लढत!!

शेखर जोशी
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

पश्‍चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतील 58 विधानसभा आणि साडेनऊ लोकसभा मतदारसंघाचा विस्तार असलेल्या हा पदवीधर मतदारसंघाच्या इतिहासावर एक कटाक्ष टाकला तर असे लक्षात येते की, पहिल्यांदा समाजवाद्यांचा असलेला हा गड नंतर आरएसएस-भाजप यांच्या ताब्यात आला आहे. विशेष म्हणजे कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे राजकीय वर्चस्व असतानाही त्यांना एकदाही येथे आपला उमेदवार आणता आलेला नाही

सांगली : पदवीधर मतदार संघाच्या मैदानातील दोन्ही बलाढ्य उमेदवार एकाच जिल्ह्यातील किंबहुना एकाच कडेगाव-पलूस या मतदारसंघातील असे इतिहासात पहिल्यांदाच घडतंय! खरे तर पुणे पदवीधर मतदारसंघ हा काही अपवाद वगळता भाजपचा अभेद्य गड राहिला आहे. पण यावेळी या मतदारसंघातील निवडणूक भाजप आणि राष्ट्रवादीतील सत्तास्पर्धेतून अनपेक्षितपणे अत्यंत चुरशीकडे नेली आहे. अन्य पक्षांचे उमेदवारदेखील यावेळी रिंगणात असल्याने लढत बहुरंगी असली तरी खरे युद्ध भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असेच असेल असे चित्र आहे. 

नुकत्याच बिहार, मध्यप्रदेशसह विविध निवडणुकांच्या निकालांनी भाजप कार्यकर्त्यांत उत्साह दिसतो आहे तर राष्ट्रवादी यावेळी राज्यात सत्तेत असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांतदेखील अमाप उत्साह आहे, अर्थात कॉंग्रेसची साथ ते कशी मिळवतात हे देखील महत्त्वाचे आहे. कारण हे दोन्ही पक्ष राज्यात सत्तेसाठी एकत्र असले तरी ठिकठिकाणी पक्ष विस्ताराची स्पर्धाही पहायला मिळते आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतील 58 विधानसभा आणि साडेनऊ लोकसभा मतदारसंघाचा विस्तार असलेल्या हा पदवीधर मतदारसंघाच्या इतिहासावर एक कटाक्ष टाकला तर असे लक्षात येते की, पहिल्यांदा समाजवाद्यांचा असलेला हा गड नंतर आरएसएस-भाजप यांच्या ताब्यात आला आहे. विशेष म्हणजे कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे राजकीय वर्चस्व असतानाही त्यांना एकदाही येथे आपला उमेदवार आणता आलेला नाही. 1984 पूर्वीच्या तीन निवडणुकांमध्ये प्रा. ग. प्र. प्रधान यांनी सलग तीन निवडणुका जिंकल्या. 1984 मध्ये पहिल्यांदा भाजपचे म्हणजे पूर्वाश्रमीचे जनसंघाचे नारायण वैद्य यांनी विजय मिळवला. जनता दलाचे शरद पाटील वगळता गेल्या तीस वर्षांत भाजपकडेच राहिला आहे. भाजपचे येथील उमेदवार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कधीकाळी गेलेले होते. यंदा पहिल्यांदाच हा निकष डावलला आहे. 

जावडेकर आणि चंद्रकांत पाटील यांनी दोन वेळा भाजपकडून ही निवडणूक जिंकली आहे. आता पुन्हा एकदा हा मतदारसंघ आपल्याच पक्षासाठी काबीज करण्यासाठी भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात पुढील पंधरा दिवस पश्‍चिम महाराष्ट्रात युध्द जुंपणार आहे. दोन्ही बाजूनी उमेदवार म्हणून अनेक नावे आली तरी भाजपला विनिंग मेरीट दिसले ते संग्रामसिंह देशमुख यांच्यातच! त्यामुळे पहिल्यांदाच संघाच्या कोअर टिमच्या बाहेरचा उमेदवार त्यांनी उतरवला आहे.

राष्ट्रवादीकडूनदेखील अनके नार्वे चर्चेत राहिली पण अरुण लाड यांचेच नाव आघाडीवर होते त्याप्रमाणे त्यांना उमेदवारी मिळाली. खरे तर याचे संकेत शरद पवार यांनी यापूर्वीच दिले होते. मात्र राष्ट्रवादीच्या आधी भाजपने संग्राम यांची उमेदवारी जाहीर करून राष्ट्रवादीला पेचात टाकले होते. पण राष्ट्रवादीने लाड यांनाच फलंदाजीला उतरवत पदवीधरची झुंज एकाच विधानसभा मतदारसंघात लावून दिली आहे. राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि आक्रमक नेत्यांचे तालुके म्हणून कडेगाव-पलूसची ओळख आहे. पण गंमत अशी आहे की, देशमुख-लाड हे मात्र परस्परांचे चांगले मित्र म्हणून जिल्ह्याला ओळख आहे तथापि भाजप आणि राष्ट्रवादी मात्र या निवडणुकीवरून मोठा संघर्ष धुमसतो आहे.

जयंत पाटील यांच्यासाठी ही लढत `होमपिच` म्हणून  तर चंद्रकांत पाटील यांचा हा पूर्वीचा गड अबाधित राखण्यासाठी प्रतिष्ठेची असेल. पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वच घडामोडींवर शरद पवार यांचा कटाक्ष असतो त्यामुळे राष्ट्रवादी यावेळी ही निवडणूक गंभीरपणे घेईल यात शंका नाही. अर्थात 58 विधानसभा मतदारसंघ एवढा मोठा विस्तार असलेल्या मतदारसंघात शिक्षण संस्था, विविध जात समुह यांचे नेटवर्क जो नोंदीतून प्रभावीपणे राबवितो तोच जिंकतो, असा आजवरचा अनुभव आहे.

या नेटवर्कवर हुकुमत अर्थातच भाजप आणि त्यांच्या यंत्रणांची राहिलेली आहे. गेल्यावेळी राष्ट्रवादीकडून सारंग पाटील यांनी देखील  प्रभावी नेटवर्क उभे केले होते. केवळ दोन हजार मतांनी ते त्यावेळी हरले. त्यांच्या नेटवर्कचा यावेळी राष्ट्रवादीला फायदा करून घेता येईल का? गेल्या निवडणुकीत लाड यांनी 37 हजार मते घेतली होती त्यामुळे त्यांचेही नेटवर्क त्यांनी उभे केले आहे. अन्य दोन उमेदवारांनीही चांगली मते घेतली होती. म्हणजे गेल्यावेळी मतविभाजन मोठ्याप्रमाणात झाले होते. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांची 61 हजार मते घेतली होती तर सर्व विरोधकांची बेरीज एक लाख 15 हजारावर होती. त्यामुळे यावेळीदेखील मतविभाजनाचा फायदा कोणाला होणार हे समीकरणही महत्त्वाचे असेल. कारण यावेळीदेखील जनता दलाकडून शरद पाटील, भाकपकडून शंकर पुजारी, आपकडून अमोल पवार, श्रीमंत कोकाटे (अपक्ष) असे उमेदवार रिंगणात असल्याने ही लढत बहुरंगी असणार आहे.

सर्वाधिक मतदार नोंदणी सांगली-कोल्हापूर येथीलच आहे. तसेच राष्ट्रवादीसाठी यावेळी राज्यमंत्री विश्‍वजित कदम, सत्याजित पाटील, हसन मुश्रीफ आणि स्वत: जयंत पाटील या चार मंत्र्यांची मोठी फौज या दोन जिल्ह्यात मदतीला असणार आहे. याशिवाय भारती विद्यापीठ, डीवायपाटील विद्यापीठ, रयत शिक्षण संस्था अशा संस्थांचेही पाठबळ असू शकते. भाजपकडेदेखील संघाचे व शिक्षण संस्थांचे नेटवर्क मोठे आहे. पुण्यातील त्यांच्या नेटवर्कवरच ते नेहमी बाजी मारत आले आहेत. अशी एकूण पदवीधर मतदारसंघाचे चित्र आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख