जो तो म्हणतो मीच अध्यक्ष; तरी खासदार मंडलिकांवर सर्वांचे लक्ष

...
mp sanjay mandlik role imp in zp president election
mp sanjay mandlik role imp in zp president election

कोल्हापूर ः जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) म्हणजेच ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण पडल्याने जो तो सदस्य आपणच दावेदार असल्याचे सांगत आहे. पार्टीच्या नेत्यांशी चर्चा झाली आहे, मला ग्रीन सिग्नल दिला आहे इथंपासून ते आपणच कसे प्रबळ दावेदार आहोत, हे सांगत दिवसभर जिल्हा परिषदेत चर्चेचे फड रंगू लागले आहेत.

अध्यक्ष पदासाठी आरक्षण सोडत निघाली असून यावेळी ओबीसी प्रवर्गाचा अध्यक्ष होणार आहे. सत्ताधारी आणि विरोधी आघाडीकडून आत्तापर्यंत या प्रवर्गातून निवडून आलेल्या 18 सदस्यांची नावे पुढे आली होती; मात्र आता खुल्या वर्गातून निवडून आलेल्या पण ओबीसी प्रमाणपत्र असलेल्या सदस्यांनीही रिंगणात उडी घेतली आहे. त्यामुळे दावेदारांची संख्या 18 वरून 23 झाली आहे. ओबीसी प्रमाणपत्र असलेल्या मात्र आरक्षणातून न लढलेल्या राष्ट्रवादीच्या एक व जनसुराज्यच्या दोन सदस्यांची नावे चर्चेत आली आहेत.

आरक्षण जाहीर झाल्यानंतर बहुतांश दावेदार सदस्यांनी आज जिल्हा परिषदेत हजेरी लावली. हे सदस्य आपणच कसे खरे दावेदार आहोत ते सांगत आहेत. आपणाला कोणत्या सदस्य आणि आघाडीचा पाठिंबा आहे, मॅजिक फिगर गाठण्यासाठी काय नियोजन केले आहे आदी माहिती देत इतर सदस्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू होता. राष्ट्रवादीच्या एका सदस्याने तर थेट सहलीची ऑफर दिल्याची चर्चा होती.

पदाधिकारी बदलात स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना, आवाडे गट, चंदगड विकास आघाडी यांची भूमिका निर्णायक राहणार आहे. जर सेनेचे सदस्य एकत्र झाले तर त्यांना अन्य आघाडीच्या सदस्यांची गरज राहणार नाही. सेनेचे दहा सदस्य ज्या बाजूला जातील त्यांचा अध्यक्ष, असे सध्याचे चित्र आहे. हे सदस्य एकत्रित आले तर सव्वा-सव्वा वर्षाचा फॉम्युला निघून सेनेचा अध्यक्ष झाल्यास नवल वाटण्याचे कारण नाही. सेनेचे नेते खासदार प्रा. संजय मंडलिक यासाठी प्रयत्नशील आहेत. सदस्य जरी अध्यक्षपदासाठी दावेदारी करत असले तरी नेतेमंडळी मात्र राज्याच्या राजकारणात व्यस्त आहेत. राज्यातील तिढा सुटला तर जिल्ह्यातही काही अडचण येणार नसल्याने कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे नेते मुंबईतील घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत.

एक सदस्य असणारेही दावेदार
जिल्हा परिषदेत भाजप, राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेना यांच्यासह स्थानिक आघाड्या, अपक्ष आणि गटातटाचे सदस्य आहेत. काही गटाचा तर एकच सदस्य आहे. तरीही त्यांनी अध्यक्ष पदावर दावा केला आहे. अध्यक्षपदावर दावेदारी करून उपाध्यक्ष किंवा समिती सभापतिपद मिळवण्यासाठीही काही जण दावेदारी करत असल्याचे दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com