kolhapur zp | Sarkarnama

कोल्हापूर झेडपीत "बिनविरोध'चा गोंधळ!

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 21 एप्रिल 2017
एकहाती जिल्हा परिषदेत सत्ता असली तरी आठ पक्षांचे कडबोळे सांभाळताना सत्ताधाऱ्यांची चांगलीच कसरत होत आहे. महिन्याभरातच आघाड्यांची नाराजी नको म्हणून भाजप आघाडीचे समितीनिहाय सदस्यच सत्ताधाऱ्यांना जाहीर करता आले नाहीत. जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदा ही नामुष्की पाहायला मिळाली.

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या सदस्य निवडीत कोण कोणत्या समितीत हेच निश्‍चित न झाल्याने या निवडीचा घोळ बिनविरोध निवडी झाल्याचे जाहीर करूनही कायम राहिला. सत्तारूढ गटातच ठराविक समिती जाण्यावरून सदस्यांत असलेल्या नाराजीमुळे निवडी होऊन समितीनिहाय यादी जाहीर न करण्याची नामुष्की सत्ताधाऱ्यांवर आली.

दरम्यान, दहा समितीतील 83 जागांसाठी 73 जणांची बिनविरोध निवड झाली. उर्वरित दहा जागांपैकी 50 टक्के जागांची मागणी कॉंग्रेस आघाडीने केली. त्याला सत्ताधाऱ्यांनी विरोध केल्याने या दहा नावांचाही गोंधळ मिटला नाही. परिणामी या दहा नावांची घोषणा नेत्यांशी चर्चा करून नंतर जाहीर करण्यात येईल, असे सभेत अध्यक्षा शौमिका महाडीक यांनी जाहीर सांगितले.

विषय समितीच्या सदस्य निवडीसाठी नवनिर्वाचित सदस्यांची सर्वसाधारण सभा सौ. महाडीक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेची वेळ दुपारी एकची होती; पण नावांचा घोळ निर्माण झाल्याने सभा दोन वाजता सुरू झाली. त्यात हातकणंगले तालुक्‍यातील एका सदस्याने मी आल्याशिवाय सभा सुरू करायची नाही, असा दम गटनेत्यांना भरला. त्यामुळेही सभेला उशीर झाला. 

तत्पूर्वी समितीनिहाय सदस्यांची नावे निश्‍चित करण्यासाठी सत्तारूढ आघाडीची बैठक अध्यक्षांच्या बंगल्यावर, तर कॉंग्रेस आघाडीची बैठक शासकीय विश्रामगृहावर झाली. कॉंग्रेस आघाडीची नावे लगेच निश्‍चित झाली, तशी यादी व उमेदवारी अर्जही त्यांच्याकडून भरले; पण सत्तारूढ आघाडीची नावे निश्‍चित होत नव्हती. ठराविक समितीसाठीच सदस्यांनी आग्रह धरल्याने ही नावे निश्‍चित झाली नाहीत. त्यानंतर अध्यक्षांसह सर्व सदस्य जिल्हा परिषदेत आले. कॉंग्रेस आघाडीला समितीनिहाय किती जागा द्यायच्या यासाठी दोन्ही आघाड्यांच्या नेत्यांची बैठक अध्यक्षांच्या दालनात झाली. त्यात कॉंग्रेस आघाडीच्या नेत्यांनी प्रत्येक समितीत पन्नास टक्के वाटा हवा असल्याचा आग्रह धरला. त्याला सत्ताधारी गटातील नेत्यांनी विरोध दर्शवला. कॉंग्रेसतर्फे उमेश आपटे, युवराज पाटील, जयवंत शिंपी यांनी भाग घेतला. चर्चेनंतर समितीनिहाय कुठे 45 टक्के, तर कुठे 48 टक्के जागा देण्यावर तोडगा निघाला. त्यानंतर सर्व पदाधिकारी व गटनेते सभागृहात आले. तोपर्यंत दोन वाजून गेले होते.
बांधकाम, अर्थ व शिक्षण समितीत जाण्यासाठी सर्वच पक्षांच्या सदस्यांची मागणी आहे. पण जागा कमी व मागणी करणाऱ्यांची संख्या जास्त अशी स्थिती निर्माण झाली. त्यामुळे सत्तारूढ गटाच्या सदस्यांचे फक्त उमेदवारी अर्ज भरून घेतले व समिती कोणती हे नंतर जाहीर करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

सभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर सौ. महाडीक यांनी 83 जागांसाठी 73 जणांचे अर्ज आल्याचे सांगत या सर्व निवडी बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर पक्षप्रतोद विजय भोजे यांनी उर्वरित 10 जागांचा निर्णय पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांच्याशी चर्चा करून घेण्यात येईल, असे सांगितले. त्याला कॉंग्रेसचे उमेश आपटे यांनी अनुमोदन दिल्यानंतर सभा संपल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी जाहीर केले; पण समितीनिहाय सदस्यांची यादीच सायंकाळी उशिरापर्यंत तयार झाली नव्हती. ही नावे निश्‍चितीचा घोळ उशिरापर्यंत अध्यक्षांच्या दालनात सुरू होता.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख