kolhapur zp | Sarkarnama

झेडपी अध्यक्षांचा कार्यालय प्रवेश पट्टेवाल्याच्या हस्ते 

सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 25 मार्च 2017

जिल्हा परिषद किंवा महापालिकेतील नव्या पदाधिकाऱ्यांचा कार्यालय प्रवेश हा नेहमीच उत्सुकतेचा विषय. हा प्रवेश एकतर या दोन संस्थांवर सत्ता कुठल्या नेत्यांची त्यांच्या हस्ते किंवा त्यांच्या सौभाग्यवतींच्या हस्ते ठरलेला. जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्षा सौ. शौमिका महाडीक यांचा कार्यालय प्रवेश मात्र त्याला अपवाद ठरला.

कोल्हापूर : जिल्हा परिषद किंवा महापालिकेतील नव्या पदाधिकाऱ्यांचा कार्यालय प्रवेश हा नेहमीच उत्सुकतेचा विषय. हा प्रवेश एकतर या दोन संस्थांवर सत्ता कुठल्या नेत्यांची त्यांच्या हस्ते किंवा त्यांच्या सौभाग्यवतींच्या हस्ते ठरलेला. जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्षा सौ. शौमिका महाडीक यांचा कार्यालय प्रवेश मात्र त्याला अपवाद ठरला. त्यांनी चक्क अध्यक्षांच्या मागे गेली अनेक वर्षे सावलीप्रमाणे असलेल्या पट्टेवाल्याच्या हस्ते करून एक वेगळा आदर्श राज्यात घालून दिला आहे. 

या कार्यक्रमात ऐनवेळी पक्षाचा गटनेता बदलल्याने जरूर मानापमान नाट्य रंगले, पण कार्यालय प्रवेश एका सामान्य कर्मचाऱ्याच्या हस्ते करून झाल्याने या नाट्यापेक्षा कर्मचाऱ्याच्या सन्मानाची चर्चा जिल्हा परिषदेत रंगली. जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. महाडीक, उपाध्यक्ष श्री. पाटील व श्री. इंगवले यांनी आज कार्यालयात समारंभपूर्वक प्रवेश केला. या निमित्ताने कार्यालयाचा परिसर फुलांनी सुशोभित करण्यात आला होता. 

जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच अध्यक्ष व उपाध्यक्षांनी समारंभपूर्वक कार्यालयात प्रवेश करण्याचा कार्यक्रम झाला. प्रथम सौ. महाडीक यांनी आपल्या कार्यालयात प्रवेश केला. अध्यक्षांच्या दालनात गेल्या अनेक वर्षांपासून हवालदार म्हणून काम करणारे (पट्टेवाला) प्रकाश आपटे यांच्या हस्ते कार्यालय प्रवेशाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर सौ. महाडीक यांनी अध्यक्ष कार्यालयात प्रवेश केला. कार्यालयात प्रवेश करताच बाहेर फटाक्‍यांची आतषबाजी करण्यात आली. या कार्यक्रमाला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

उपाध्यक्ष श्री. पाटील यांनी गटनेते अरुण इंगवले यांच्या उपस्थितीत कार्यालयात प्रवेश केला. पक्षप्रतोद व गटनेते यांच्यासाठी एकच केबिन आहे. त्यामध्ये गटनेते म्हणून श्री. इंगवले यांनी प्रवेश केला. पक्षप्रतोद म्हणून यापूर्वीच नियुक्‍ती केलेले विजय भोजे मात्र या कार्यक्रमास अनुपस्थित राहिले. जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्यानंतर नवनिर्वाचित सदस्यांची पहिली बैठक भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीत विजय भोजे यांची पक्षप्रतोद म्हणून निवड करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड झाल्यानंतर कार्यालयीन प्रवेशाचा समारंभ आज निश्‍चित झाला. अध्यक्ष सौ. महाडीक यांनी पक्षप्रतोद पदाबाबत प्रशासनाला पत्रही दिले. दुपारी अध्यक्ष कार्यालयाकडून सर्वांना कार्यालय प्रवेशाचे निमंत्रणही गेले. 

प्रशासनही तयारीला लागले. रात्री अचानक अध्यक्षांच्या स्वीय सहायकांनी पक्षप्रतोद कार्यालयात गटनेते म्हणून अरुण इंगवले यांची निवड झाली आहे, त्यांच्या नावाचीही पाटी तयार करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. त्यांनी पक्षप्रतोदांच्या कार्यालयात आणखी एक टेबल व जुनी खुर्ची लावून त्या ठिकाणी विजय भोजे यांच्या नावाची पाटी लावली. यामुळे नाराज झालेले पक्षप्रतोद श्री. भोजे यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवत नाराजी व्यक्‍त केली. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख