kolhapur zp | Sarkarnama

जिल्हा परिषदेत "नो-व्हेईकल' डे 

सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 25 मार्च 2017

जिल्हा परिषदेच्या आवारात आजपासून नो व्हेईकल सुरू करण्यात आले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडीक, उपाध्यक्ष सर्जेराव पाटील यांनी या उपक्रमाचे स्वागत करत गेटवर उतरून ते चालत जिल्हा परिषदेत गेले. मात्र अरुंधती महाडीक व भाजपचे नवे गटनेते अरुण इंगवले यांनी मात्र आपली वाहने जिल्हा परिषदेच्या आवारात आणली. श्री. इंगवले ज्येष्ठ सदस्य असल्यामुळे सुरक्षा रक्षकांनी त्यांना विनंती केली, मात्र नेहमीप्रमाणे त्यांनी त्याला जुमानता आपली गाडी जिल्हा परिषदेच्या आवारात आणली. 

कोल्हापूर : जिल्हा परिषद परिसरात आजपासून सुरू केलेल्या नो व्हेईकलला प्रायोगिक तत्त्वावर मान्यता देण्यात येत आहे. यासंदर्भात अन्य पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून तसेच त्यातील उणिवा पाहून अंतिम निर्णय घेण्यात येईल. देशात नावलौकिक असलेल्या आपल्या जिल्हा परिषदेचा कारभारसुद्धा आदर्श व पारदर्शकपणे करत देशात पहिल्या क्रमांकाची जिल्हा परिषद बनविण्याचे आपले ध्येय असल्याचे जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्ष शौमिका महाडीक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

कार्यालय प्रवेश कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना अध्यक्ष सौ. महाडीक म्हणाल्या, जिल्ह्याचे नेते कै. बाळासाहेब माने, कै. दिनकरराव यादव यांच्यासारख्या दिग्गज व्यक्‍ती जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसले, तो मान आता मला मिळाला आहे. निर्मल ग्राम योजना प्रभावीपणे राबविणे, शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम, आरोग्य शिबिर, प्राथमिक शाळांमधील मुलांची गळती थांबवणे, ग्रामीण भागातील लोकांना पुरेसे व स्वच्छ पाणी पुरवठा करण्याच्या कामाला आपले प्राधान्य राहील. जिल्हा परिषदेचा कारभार करताना जिल्ह्यात कोठेही विकासाच्या आड येणारे राजकारण आपल्याकडून होणार नाही. ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय सेवा अधिक गतिमान करण्यासाठी गोकूळ सारख्या संस्थांची मदत घेण्यात येईल. देवदासी, दलित, मागासवगींय यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे जीवनमान
उंचावण्याचा आपण शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख