kolhapur zp | Sarkarnama

कोल्हापुरात घोडेबाजाराची शक्‍यता 

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 16 मार्च 2017

जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत दोन्ही आघाड्यांकडे काठावरील बहुमत असल्याने मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होण्याची शक्‍यता आहे. यानिमित्ताने तालुका पातळीवर तयार झालेल्या स्थानिक आघाड्यांना व त्यांच्या नेत्यांचाही भाव वधारला असून पैसे देवाण-घेवाण करण्यासाठी वाटाघाटीही सुरू झाल्या आहेत. 

कोल्हापूर : जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत दोन्ही आघाड्यांकडे काठावरील बहुमत असल्याने मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होण्याची शक्‍यता आहे. यानिमित्ताने तालुका पातळीवर तयार झालेल्या स्थानिक आघाड्यांना व त्यांच्या नेत्यांचाही भाव वधारला असून पैसे देवाण-घेवाण करण्यासाठी वाटाघाटीही सुरू झाल्या आहेत. 

दोन्ही कॉंग्रेससह भाजप आघाडीला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तेच्या चाव्या स्थानिक आघाड्यांच्या हातात आहेत, त्यातही शिवसेनेच्या भूमिकेला अधिक महत्त्व आहे. सेनेतही धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेल्यांपेक्षा त्यांच्या नेता कोण, यावरून जोडणी सुरू झाली आहे. त्यातून आमदार प्रकाश अबीटकर यांचे दोन, उल्हास
पाटील यांचा एक सदस्य कॉंग्रेससोबत, आमदार चंद्रदीप नरके यांच्या तीन सदस्यांची भूमिका अध्यक्ष पदाचा उमेदवार निश्‍चित झाल्यानंतर तर आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांचा निर्णय गुलदस्त्यात अशी स्थिती आहे. 

सद्यःस्थितीत भाजप व आघाडीकडे 33 तर कॉंग्रेस आघाडीकडे 34 सदस्य आहेत. 67 सदस्य असलेल्या सभागृहात बहुमतासाठी 34 सदस्यांची गरज आहे. दोन्ही आघाडीकडे काठावरील बहुमत आहे, त्यामुळे प्रत्यक्ष सभागृहात अध्यक्ष निवडणुकीत हात कोण कोणासाठी वर करेल तोपर्यंत अध्यक्ष कोणाचा हे ठामपणे सांगता येणार नाही अशी आजची स्थिती आहे. त्यामुळे आणखी दोन-चार सदस्य गळाला लागतात का ? याची चाचपणी दोन्हीकडून सुरू आहे. त्यासाठी पैशाबरोबरच पदाचे
आमिषही दाखवले जात आहे. आता जरी पद नसले तरी काही लाखांवर पाठिंबा मिळवून अडीच वर्षानंतर पद देण्याचे आश्‍वासन दिले जात आहे. 

भाजप-सेना मिळून चिन्हावर निवडून आलेले 24 सदस्य, "जनसुराज्य' चे सहा तर ताराराणीचे तीन असे 33 सदस्य आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडे चिन्हावर निवडून आलेले 25, अबीटकर आघाडीचे दोन, एक अपक्ष व स्वाभिमानीचे दोन असे 30 सदस्य आहेत. शिवसेनेचे उल्हास पाटील यांचा एक तर सत्यजित पाटील-सरूडकर यांचे दोन सदस्यही कॉंग्रेससोबत राहतील, त्याचबरोबर आणखी एक सदस्य मिळून 34 सदस्य त्यांच्याकडे होतात. 

चंदगड आघाडीचे दोन सदस्य निर्णायक भूमिकेत आहेत. त्यांना सहलीवर पाठवून भूमिका गुलदस्त्यात ठेवण्याची युक्ती आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी खेळली आहे. त्यातून इतर आघाड्यांचेही महत्त्व वाढले आहे, म्हणूनच सदस्यांना थेट खरेदी करूनच त्यांचा पाठिंबा मिळवण्याच्या हालचाली सद्या सुरू आहेत. त्यासाठी मोठी
आर्थिक उलाढाल येत्या दोन दिवसांत शक्‍य आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख