kolhapur zp | Sarkarnama

कोण कोणासोबत ताळमेळ लागेना! 

सरकारनामा ब्युरो 
शुक्रवार, 10 मार्च 2017


जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी कॉंग्रेसकडून पी. एन. यांचे पुत्र राहुल यांचे नांव आल्यास त्याला आवाडे यांच्यासह सतेज पाटील यांचाही विरोध राहील. भाजपकडून अरुण इंगवले यांच्या नावाची चर्चा असली तरी त्यांनाही आतापासूनच विरोध होऊ लागला आहे. सौ. शौमिका महाडीक यांचे नाव पुढे आल्यास "जनसुराज्य' व प्रा.संजय मंडलिक यांच्याकडूनही विरोधाची शक्‍यता आहे. कॉंग्रेसमध्ये सद्या तरी राहुल पाटील यांचीच चर्चा सुरू आहे, त्याला आमदार चंद्रदीप नरकेही मान्यता देण्याची शक्‍यता नाही. भाजपची सत्ता यायची वेळ आल्यास सर्वमान्य म्हणून गडहिंग्लजचे डॉ. हेमंत कालेकर यांचे नाव ऐनवेळी पुढे येण्याची शक्‍यता आहे. 

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या सत्ताकारणात कोण कोणाबरोबर जाणार याचा ताळमेळ लागेना. दोन्ही कॉंग्रेसबरोबरच भाजपकडून आपलाच अध्यक्ष होणार असे सांगितले जात असले तरी "स्वाभिमानी' च्या दोन सदस्यांसह आघाडीतून निवडून आलेले सहा सदस्यच अध्यक्ष ठरवणार आहेत. पण, या आघाड्याही कोणासोबत जाणार याचे चित्र अद्यापही अस्पष्ट आहे. 

दरम्यान, कालच कॉंग्रेस नेत्यांवर तोफ डागलेले पक्षाचे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी गुरुवारी रात्री माजी आमदार महादेवराव महाडीक यांची त्यांच्या निवासस्थानी
भेट घेऊन चर्चा केली. जिल्ह्याच्या राजकारणात श्री. आवाडे यांचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्याशी मतभेद आहेत. पक्षाच्या बाहेर जाऊन काही करणार नाही असे जरी श्री. आवाडे यांनी जाहीर केले असले तरी त्यांनी श्री. महाडीक यांच्या घेतलेल्या भेटीने राजकीय संदर्भ बदलण्याची शक्‍यता आहे. 

जिल्हा परिषदेत दोन्ही कॉंग्रेसचे चिन्हावर निवडून आलेले सदस्य 25 आहेत. सेना भाजपसोबत गेल्यास त्यांचे चिन्हावरील सदस्य 20 होतात, त्यात जनसुराज्यच्या सहा व ताराराणी आघाडीच्या तीन सदस्यांची भर पडल्यास ही संख्या 33 वर जाते. सेना भाजपासोबत राहिली तरच हे गणित शक्‍य आहे. बहुमतासाठी त्यांना एका सदस्यांची गरज आहे. पण आघाडीच्या माध्यमातून सहा तर स्वाभिमानीचे दोन असे आठ सदस्य निर्णायक भूमिकेत आहेत. एका अपक्ष सदस्यांनी यापूर्वीच कॉंग्रेससोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कॉंग्रेसला बहुमतासाठी आठ सदस्यांची गरज आहे. 

"स्वाभिमानी'सह आघाडीचे सहा मिळून आठ सदस्य जिल्हा परिषदेवर सत्ता कोणाची हे ठरवणार आहेत. पण आजच्या घडीला कोण कोणाबरोबर याचा ताळमेळ लागेना झाला आहे. दोन्ही बाजूकडून बहुमताचा दावा केला जात असला तरी तो आघाडीच्या निर्णयाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. रविवारी शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर कोल्हापुरात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत शिवसेनेची भूमिका ठरेल. ही भूमिका काय असेल यावर सत्ता कोणाची हेही ठरणार आहे. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख