kolhapur zp | Sarkarnama

कोल्हापुरात भाजपचा अध्यक्ष, शिवसेनेचा उपाध्यक्ष ! 

विकास कांबळे : सरकारनामा न्यूजब्युरो 
गुरुवार, 9 मार्च 2017

ग्रामीण भागातील मतदारांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विरोधात मतदान करत भारतीय जनता पक्षाला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पहिली
पसंती दिली आहे. त्याचा लाभ उठविण्यासाठी मुंबई महापालिका महापौरपदाची निवडणूक झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने जिल्हा परिषदेतील सत्तेसाठी हालचाली गतिमान केल्या आहेत.

कोल्हापूर : ग्रामीण भागातील मतदारांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विरोधात मतदान करत भारतीय जनता पक्षाला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पहिली
पसंती दिली आहे. त्याचा लाभ उठविण्यासाठी मुंबई महापालिका महापौरपदाची निवडणूक झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने जिल्हा परिषदेतील सत्तेसाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. त्यासाठी शिवसेनेला उपाध्यक्ष, तर जनसुराज्य शक्‍ती पक्षाला बांधकाम समिती सभापतीचा प्रस्ताव दिला असल्याचे समजते. शिवसेना अधिक
आग्रही राहिली तर त्यांना आणखी एखादे पद देण्याचीही तयारी भाजपने ठेवली आहे. यामध्ये आमदार सुरेश हळवणकर महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. 

कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मुसंडी मारत, कॉंग्रेस इतक्‍या जागा जिंकत भारतीय जनता पक्ष पहिल्या क्रमांकावर आहे; मात्र या
निवडणुकीत मतदारांनी कोणालाच स्पष्ट बहुमत दिले नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच सत्तेसाठी त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. कॉंग्रेस व
राष्ट्रवादी एकत्र आले तरी त्यांचे बहुमत होत नाही. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने केलेल्या आघाडीसह एकत्र आले तरी त्यांचेही बहुमत होत नाही. त्यासाठी
शिवसेनेची मदत आवश्‍यक आहे. 

भारतीय जनता पक्षाने स्थानिक पातळीवरील जनसुराज्य शक्‍ती पक्ष किंवा तालुक्‍यातील प्रमुख कार्यकर्त्यांसोबत आघाडी केली. या आघाड्यांनाही चांगले यश आले
आहे. त्या आघाड्यांमध्ये ताराराणी आघाडी, चंदगडची आघाडी यांचा समावेश आहे. या आघाड्यांपैकी ताराराणी आघाडी भारतीय जनता पक्षासोबत आहे. चंदगडची
आघाडीही भाजपसोबत जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे शिवसेनासोबत आली की भाजपची जिल्हा परिषदेवर सत्ता येण्यास अडचण नाही. हे भाजपच्या
नेत्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आता चर्चेला सुरवात केली आहे. जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष करण्यासाठी नेत्यांनी चांगलीच कंबर कसली
आहे. त्यासाठी केवळ जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आपल्याकडे ठेवून अन्य पदे मदत करणाऱ्या पक्षांना किंवा आघाड्यांना देण्याची त्यांनी तयारी ठेवली आहे. या
सर्वांची गोळाबेरीज करण्यासाठी आमदार सुरेश हळवणकर यांनी पुन्हा एकदा पायाला भिंगरी बांधली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपची
सत्ता जिल्हा परिषदेत आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सोबत येणारे नाराज होणार नाहीत, याची काळजी ते घेत आहेत. त्यासाठी पदाबाबतचा प्रस्ताव
त्यांनी दिला आहे. 

अध्यक्ष, उपाध्यक्ष व चार सभापती अशी सहा पदे जिल्हा परिषदेत आहेत. सुरवातीला शिवसेनेला उपाध्यक्ष, तर जनसुराज्य शक्‍ती पक्षाला बांधकाम समिती
सभापतिपदासह आणखी एखादे पद देण्याची भाजपची तयारी असल्याचे समजते. ताराराणी आघाडी माजी आमदार महादेवराव महाडीक यांची असल्यामुळे ही आघाडी
पदासाठी फारशी आग्रही राहणार नाही, मात्र शौमिका महाडीक यांच्यासाठी अध्यक्षपदाकरिता आग्रह धरण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. ज्येष्ठ सदस्य अरुणराव
इंगवलेदेखील अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार आहेत. सर्वमान्य म्हणून ऐनवेळी डॉ. हेमंत कालेकर यांनाही या पदावर संधी मिळण्याची शक्‍यता आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख