कोल्हापूर जिल्हा परिषदेत सत्तेसाठी जोरदार मोर्चेबांधणी

 कोल्हापूर जिल्हा परिषदेत सत्तेसाठी जोरदार मोर्चेबांधणी

कोल्हापूर ः जिल्हा परिषदेवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकण्यासाठी राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीबरोबरच दोन्ही कॉंग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपाला तब्बल 14 जागा मिळाल्याने नेत्यांचा आत्मविश्‍वासही वाढला असून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व माजी आमदार महादेवराव महाडीक यांनी भाजपाचीच सत्ता येईल यासाठी रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. त्याची सुत्रे अर्थातच श्री. महाडीक यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. 

जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून सत्तेवर असलेल्या कॉंग्रेसला यावेळच्या निवडणुकीत धक्का देत भाजपा, सेनेने चांगलीच मुसंडी मारली. राज्य पातळीवर सेना-भाजपा युतीचा निर्णय न झाल्याने कोल्हापुरातही हे दोन पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याची शक्‍यता सध्यातरी दिसत नाही. मुंबईत युती झाली तर राज्यात इतरत्रही ती कायम राहील, मग मात्र भाजपा-सेनेला सत्तेपासून कोणीही रोखू शकणार नाही एवढे संख्याबळ निश्‍चित युतीकडे राहील. कॉंग्रेस, राष्ट्रवादीला हा आणखी एक मोठा धक्का असेल. 

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपाला 14 तर शिवसेनेला 10 जागा मिळाल्या आहेत. सत्तेसाठी 33 संख्याबळ आवश्‍यक आहे. सद्यस्थितीत "जनसुराज्य' भाजपासोबत आहे, त्यांच्या सहा जागा निवडून आल्या आहेत. त्याचबरोबर श्री. महाडीक यांच्या आघाडीच्या 3 तीन जागा आहेत. हे सगळे एकत्र आले तर बहुमतासाठी केवळ एका सदस्यांची त्यांना गरज असेल. त्यासाठी राजकारणातील "मनी, मॅन, मसल' पॉवरचा वापर करून भाजपा सत्तेत कोणत्याही परिस्थितीत येईल. 
युती फिसकटली तर मात्र कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होईल. कॉंग्रेसचे 14, राष्ट्रवादीचे 11 असे 25 सदस्य आहेत. भुदरगडमधील आमदार प्रकाश अबीटकर गटाच्या दोन, चंदगडमधील आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या आघाडीच्या दोन असे चार सदस्य या आघाडीसोबत असतील. ही संख्या 29 वर पोहचते. शिंगणापूर गटातून अपक्ष विजयी झालेल्या रसिका पाटील ह्या कॉंग्रेससोबत राहतील. याशिवाय कॉंग्रेसचे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केलेल्या आघाडीलाही दोन जागा मिळाल्या आहेत, तेही कॉंग्रेससोबत राहीले तर कॉंग्रेस आघाडीचे संख्याबळ 32 वर पोहचते.

मावळत्या सभागृहात स्वाभिमानी शेतकरी संघटना कॉंग्रेससोबत आहे, पण राज्याच्या राजकारणात भाजपासोबत आहे. "स्वाभिमानी' ला दोन जागा मिळाल्या आहेत. पण सद्यस्थितीत "स्वाभिमानी' चे सर्वेसर्वा खासदार राजू शेट्टी सरकारवर नाराज आहेत. त्यातून ते आपले दोन सदस्य एखादे पद मिळण्याच्या अटीवर कॉंग्रेस आघाडीला देण्याची शक्‍यता आहे. हे दोन सदस्य आले तर बहुमतासाठी आवश्‍यक 34 सदस्य होतील व कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा सत्तास्थापनेचा मार्ग सुकर होईल. यात भुदरगड आघाडी, आवाडे आघाडी व कुपेकर आघाडीबरोबरच "स्वाभिमानी' लाही एखादे पद द्यावे लागेल. 

अध्यक्ष कॉंग्रेसचा, उपाध्यक्ष राष्ट्रवादीचा 
अध्यक्ष कॉंग्रेसचा, उपाध्यक्ष राष्ट्रवादीचा व इतर पदे पाठिंबा दिलेल्या आघाडीला देऊन कॉंग्रेसची सत्ता कायम राहील अशी शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. संख्या कमी असूनही आघाडीला पर्यायाने कार्यकर्त्याला पद मिळत असेल तर या आघाड्याही कॉंग्रेससोबत राहतील. पण दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांना मात्र यासंदर्भातील हालचाली अतिशय सावधपणे सुरू केल्या आहेत. यात बाजी कोण मारणार हे काळच ठरवणार आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com