Kolhapur SP and his wife fighting war against corona simultaneously | Sarkarnama

कोरोनाविरोधात त्या दोघांची अशी लढाई : SP अभिनव देशमुख रस्त्यावर; तर पत्नी सोनाली दवाखान्यात!

निवास चौगले
सोमवार, 13 एप्रिल 2020

अभिनव देशमुख यांनी कोल्हापुरात अनेक चांगल्या कामांनी ठसा उमटवला आहे. त्यांच्या पत्नीही खांद्याला खांदा लावून उतरल्या आहेत. 

कोल्हापूर : राज्यात आणि देशावर कोणतेही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित संकट आले तर अनेक कारणे सांगून त्यापासून दूर पळणारे शासकीय अधिकारी कमी नाहीत, पण काही अधिकारी त्याला अपवाद आहेत. कोरोनासारख्या महाभंयकर संकटाचा सामना करण्यासाठी पती दिवसरात्र रस्त्यावर तर कोरोना रूग्णावर उपचार करण्यासाठी त्यांच्या पत्नी थेट कोरोना कक्षात जीवाची बाजी लावून काम करतात. होय, कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आणि त्यांच्या पत्नी सौ. डॉ. सोनाली या दाम्पत्याने कर्तव्याला प्राधान्य देत थेट रस्त्यावर उतरून कामे करत आहेत.

पती पोलीस अधीक्षक म्हटल्यावर डॉ. सोनाली यांना सीपीआरमध्ये कोठेही ड्युटी लावून घेता आली असती. किंबहुना त्या ज्या प्रसुतीशास्त्र विभागात काम करतात तिथेच त्या काम करू शकल्या असत्या. पण त्यांनी मुद्दाम कोरोना कक्षातच आपली ड्युटी लावून घेतली आहे. आठवड्यातील दोन दिवस सलग 24 तास पीपीई किट घालून त्या कोरोना कक्षातील रूग्णांच्या सेवेत आहेत.
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी यापुर्वी गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात अतिशय उठावदार काम केले. त्यानंतर कोल्हापुरात त्यांची पोस्टींग झाली.

वरवर शांत, संयमी वाटणाऱ्या या अधिकाऱ्याने जिल्ह्यातील गुंडांच्या मनात चांगलीच धडकी भरवली आहे. कोल्हापुरचे मटक्‍याचे कनेक्‍शन उध्वस्त करताना यात सहभागी असलेल्या थेट मुंबईपर्यंतच्या गुन्हेगारांना त्यांनी कारागृहाचा रस्ता दाखवला आहे. आपल्या कार्यशैलीने त्यांनी जनमानसात आपली एक चांगली प्रतिमा निर्माण केली आहे. गेल्या एक महिन्यापासून ते रस्त्यावर आहेत. सकाळी दहा वाजता बाहेर पडल्यानंतर मध्यरात्री घरी परतणाऱ्या डॉ. देशमुख यांनीही कोरोनोविरोधात आपल्या जीवाची बाजी लावून काम केले आहे.

कोरोनाच्या भितीने शहर आणि जिल्ह्यातील अनेक डॉक्‍टरांनी आपली रूग्णालये बंद केली आहेत. प्रशासनाने कारवाईचा इशारा दिल्यानंतर काहींची रूग्णालये सुरू झाली. अजूनही काही डॉक्‍टर वेगवेगळी कारणे सांगून रूग्णालय बंद ठेवूनच आहेत. या पार्श्‍वभुमीवर स्वतःचा जीव धोक्‍यात घालून डॉ. सोनाली देशमुख कोरोना कक्षात देत असलेली सेवा आदर्शच आहे. डॉ. सोनाली यांचे शिक्षण एमबीबीएस, डीएनबी झाले आहे. त्यांची नियुक्ती प्रसुतीशास्त्र विभागात आहे पण त्यांनी स्वतःहून कोरोना कक्षात ड्युटी लावून घेतली आहे. आपल्या कर्तव्याप्रती प्रामाणिक असल्याचे संदेशच या दाम्पत्याने इतरांसमोर ठेवला आहे.

लढवय्या वारसा घरातूनच
डॉ. सोनाली यांचे लहानपण आणि शिक्षण मुंबईत झाले असले तरी त्या मुळच्या सांगली जिल्ह्यातील आहे. स्वातंत्र्यपुर्व काळात महाराष्ट्र स्थापन झालेल्या प्रती सरकारचे संस्थापक क्रांतीअग्रणी जी. डी. लाड (बापू) यांच्या त्या नात तर मुंबई उच्च न्यायालयातील वकिल ऍड. प्रकाश लाड यांच्या त्या कन्या आहेत. कुंडल (जि. सांगली) हे त्यांचे गांव, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अरूण लाड हे डॉ. सोनाली यांचे चुलते आहेत. डॉ. सोनाली यांना लढवय्या वारसा हा घरातूनच मिळाला आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख