दक्षिणमध्ये आमदार अमल महाडिक विरूध्द ऋतुराज पाटील  सरळ लढत 

..
amal-Mahadik-Ruturaj-Patil
amal-Mahadik-Ruturaj-Patil

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीतील अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर जिल्ह्यातील दहाही मतदार संघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून सर्वच मतदार संघात उमेदवारांची संख्या जास्त असली तरी करवीरसह कोल्हापूर दक्षिण, उत्तर व शाहुवाडीत खरी लढत ही दुरंगीच आहे. कागलमध्ये, इचलकरंजीत तिरंगी तर इतर चार मतदार संघात बहुरंगी लढतीचे चित्र आज स्पष्ट झाले.


विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील दहा मतदार संघात 206 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. यापैकी 20 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. उर्वरित 186 पैकी आज अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसांपर्यंत 79 जणांनी माघार घेतल्याने रिंगणात 106 उमेदवार रिंगणात राहीले आहेत.

सर्वच मतदार संघात उमेदवारांची संख्या मोठी असली तरी लढत ही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांतच होणार आहे. तथापि रिंगणातील इतर उमेदवार मते किती घेणार यावर लढतीतील प्रमुख उमेदवारांचा विजय अवलंबून आहे. 

2014 च्या निवडणुकीत करवीरमध्ये कॉंग्रेसचे पी. एन. पाटील हे अवघ्या 710 मतांनी तर शाहुवाडीत माजी मंत्री विनय कोरे हे 388 मतांनी पराभूत झाले होते. पण त्याचवेळी या मतदार संघातील इतर छोटे पक्ष व अपक्षांना जास्त मते पडली होती. 2014 ची निवडणूक भाजपा, सेनेसह राष्ट्रवादी व कॉंग्रेसने स्वबळावर लढवली होती. 

त्याचाही फटका स्पर्धेतील पहिल्या दोन-तीन क्रमांकाच्या उमेदवारांना नक्की बसला. त्यामुळे लढत जरी प्रमुख विरोधकांत असली तरी प्रत्येक मतदार संघात असलेल्या इतर पक्षांच्या उमेदवारांबरोबरच अपक्षांना मिळणारी मतेही एखाद्या तगड्या उमेदवाराचा पराभव करू शकतात.

यावेळच्या निवडणुकीत युती आणि आघाडी कायम असली तरी पाच मतदार संघात भाजपातच बंडखोरी झाली आहे. परिणामी हे बंडखोरही प्रमुख लढतीत आले आहेत. तथापि अशा मतदार संघातही लढत ही भाजपा-सेना युती विरूध्द कॉंग्रेस आघाडी आणि बंडखोरांतच होईल.

मतदार संघनिहाय लढती अशा

मतदार संघ - रिंगणातील उमेदवार -लढतीचे चित्र मुख्य लढत


करवीर -(8) -दुरंगी -आमदार चंद्रदीप नरके विरूध्द पी. एन. पाटील


कोल्हापूर दक्षिण - (8)-दुरंगी- आमदार अमल महाडिक विरूध्द ऋतुराज पाटील


कोल्हापूर -उत्तर- (8) दुरंगी- आमदार राजेश क्षीरसागर विरूध्द चंद्रकांत जाधव


शाहुवाडी -(11)- दुरंगी- आमदार सत्यजित पाटील विरूध्द विनय कोरे


कागल -(6)- तिरंगी-  आमदार हसन मुश्रीफ विरूध्द समरजितसिंह घाटगे, संजय घाटगे


इचलकरंजी - (14) - तिरंगी - आमदार सुरेश हाळवणकर विरूध्द प्रकाश आवाडे, राहूल खंजिरे


चंदगड -(14) - तिरंगी-  राजेश पाटील विरूध्द अशोक चराटी, संग्राम कुपेकर

हातकणंगले-(16) - चौरंगी -आमदार सुजित मिणचेकर विरूध्द अशोक माने, राजू आवळे, राजीव आवळे

शिरोळ -(9 ) - चौरंगी-  आमदार उल्हास पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर, सावकर मादनाईक, अनिल यादव


राधानगरी-  (12) - बहुरंगी-  आमदार प्रकाश अबीटकर विरूध्द के. पी. पाटील, राहूल देसाई, सत्यजित जाधव, अरूण डोंगळे

दहा मतदार संघात बसपाचे उमेदवार

या विधानसभेच्या निवडणुकीत दहाही मतदार संघात बहुजन समाज पार्टीने उमेदवार उभे केले आहेत. त्या खालोखाल नऊ मतदार संघात वंचित बहूजन आघाडीचे उमेदवार आहेत. कॉंग्रेसचे पाच तर राष्ट्रवादीचे तीन उमेदवार रिंगणात आहेत.

जनसुराज्य शक्तीचे चार, बहूजन मुक्ती पार्टीचे दोन, आवाडेंच्या ताराराणीचे तीन तर पुरस्कृत्त एक, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, शेतकरी कामगार पक्ष,संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, एमआयएम, अखिल भारतीय हिंदु महासभा व स्वराज्य इंडियाचा प्रत्येक एका मतदार संघात उमेदवार आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com