कोल्हापुरात भाजपच्या बंडोबांमुळे शिवसेना  अस्वस्थ

अर्ज माघारीसाठी काही तास उरले असतानाही बहुतांश उमेदवार अर्ज मागे घेण्यास तयार नसल्याने युतीत तणाव निर्माण होण्याची शक्‍यता आहे.
kshirsagar_patil
kshirsagar_patil

कोल्हापूर  :  जिल्ह्यात भारतीय जनता पक्षातच सर्वाधिक बंडखोरी झाल्याने शिवसेना अस्वस्थ आहे. त्यामुळे बंडोबांचे बंड थंड करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अर्ज माघारीसाठी काही तास उरले असतानाही बहुतांश उमेदवार अर्ज मागे घेण्यास तयार नसल्याने युतीत तणाव निर्माण होण्याची शक्‍यता आहे. उद्या (ता. 7) अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे.

जिल्ह्यात युतीला चांगले वातावरण असतानाच पाच वर्षांत भाजपने मोठ्या प्रमाणात 'इनकमिंग' केले. येईल त्या नेत्याला विधानसभेचे गाजर दाखविले. पाच वर्षे ही मंडळी आमदार म्हणूनच वावरली. आता प्रत्यक्षात निवडणुकीला सामोरे जात असताना युती झाल्याने भाजपमध्ये आलेल्यांची गोची झाली आहे. 

बंडखोर म्हणून तर काहींनी थेट पक्षाला रामराम करूनच मित्रपक्ष असलेल्या 'जनसुराज्य'तून उमेदवारी घेतली आहे. त्यामुळे या बंडखोरांना आता आवरा म्हणून शिवसेनेचे अनेक आमदार अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडेच फिल्डींग लावत आहेत.

कागलमधून भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन बंडखोरी केलेल्या समरजितसिंह घाटगे यांच्यासाठी भाजपच्या अत्यंत वरिष्ठ वर्तुळातून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यांचा संपर्क झालेला नाही. शिरोळ येथे अनिल यादव, हातकणंगलेत अशोक माने, चंदगड येथे अशोक चराटी यांनी जनसुराज्य शक्‍ती पक्षातून उमेदवारी घेतली आहे. 

हे तिन्ही उमेदवार भाजपचे आहेत; तर कोल्हापूर उत्तरमधून उद्योगपती चंद्रकांत जाधव यांनी कॉंग्रेसची उमेदवारी घेऊन सेनेला आव्हान दिले आहे. पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने या मंडळींवर भाजपकडून काही कारवाई होण्याची शक्‍यता कमी आहे.

त्यामुळे किमान त्यांना पक्षाचे जे काही लोकप्रतिनिधी मदत करीत आहेत, त्यांना तरी थांबवा, अशी विनवणी करण्यात येत आहे. सध्या तरी त्यांना यश आलेले नाही. त्याच पद्धतीने शिरोळ येथे "राष्ट्रवादी'चे बंडखोर राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची बंडखोरी पक्षाला थांबविता आलेली नाही.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com