kolhapur sena mla | Sarkarnama

सेनेचे दोन आमदार भाजपच्या वाटेवर 

सरकारनामा ब्युरो 
रविवार, 26 मार्च 2017

सेना सरकारमध्ये असली तरी प्रत्यक्षात सेना आमदारांचे कामकाज विरोध पक्षांसारखे आहे. त्यातून विकास कामे करण्यावर मर्यादा पडत आहेत. सेनेच्या मंत्र्यांमार्फत जरी कामे करायची म्हटली तरी ते होत नाहीत अशी तक्रार या सेना आमदारांची आहे. त्यामुळेच विकास कामाला निधी देण्याबरोबरच यातील एकाला मंत्रिपदाची ऑफरही देण्यात आल्याचे समजते. 

कोल्हापूर : राज्यातील दोन्ही कॉंग्रेससह शिवसेनेचे जे 13 आमदार भारतीय जनता पक्षात जाण्याच्या तयारीत आहेत, त्यात कोल्हापुरातील दोन सेना आमदारांचा समावेश आहे. पक्षांतर्गत जिल्हाप्रमुखांशी असलेला वाद, सहसंपर्क प्रमुखांची प्रत्येक निवडणुकीतील वेगळी भूमिका यातून या दोन आमदारांनी भाजपत जाण्याची तयारी दर्शविल्याचे समजते. मध्यावधी निवडणुका लागल्यास हे दोन आमदार भाजपचे "कमळ' घेऊन रिंगणात उतरतील अशी शक्‍यता आहे. 

शिवसेना राज्य सरकारमध्ये भागीदार आहे, पण त्यांची भूमिका विरोधी पक्षांपेक्षा टोकाची होऊ लागली आहे. सरकारमध्ये असून सरकारला अडचणीत आणण्याचे काम सेनेकडून सुरू आहे. शेतकरी कर्जमाफीबद्दल तर सभागृह चालू न देण्यात दोन्ही कॉंग्रेसला शिवसेनेचे बळ मिळाले आहे. शिवसेनेच्या या उपद्रव्य मुल्यामुळे भाजपत अस्वस्थता आहे. त्यात अलीकडचे झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपला मिळालेले यश सेनेला खुपत आहे. त्यातून सरकारविरोधातील सेनेची भूमिका
अधिक आक्रमक झाली आहे. 

याबाबत भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत मध्यावधी निवडणुकीला सामोरे जाऊन सेनेला धडा शिकवण्याची मागणी झाली आहे. याच बैठकीत विरोधकांचे
आमदार फोडून त्यांना भाजपच्या तिकिटावर विजयी करण्यावरही चर्चा झाली आहे. या चर्चेत राष्ट्रवादी, कॉंग्रेसबरोबरच सेनेचे मिळून 13 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. यात कोल्हापुरातील दोन सेना आमदारांचा समावेश आहे. या दोन्हीही आमदारांची जिल्ह्यातील वाटचालही त्याच दिशेने सुरू आहे. 

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत पक्षाचे सहसंपर्क, जिल्हा प्रमुख यांनी दोन्ही कॉंग्रेसला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला असताना हे दोन आमदार मात्र भाजपच्या मागे उभे राहिले. पक्षाध्यक्ष धुडकावून या दोन आमदारांनी भाजपला मदत केल्याचा आरोप जिल्हा प्रमुख व सहसंपर्क प्रमुखांचा आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या विरोधात पक्षाकडे तक्रारही करण्यात आली आहे. या तक्रारीवर कारवाई होणार का नाही माहीत नाही पण हेच दोन आमदार मात्र सेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा जिल्ह्याच्या व राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे एवढे नक्की. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख