राजर्षी शाहू महाराजांचे थेट वारस कागलच्या मैदानात; मुश्रीफांविरोधात शड्डू! 

कोल्हापूरजिल्ह्याच्या राजकारणात राजकीय विद्यापीठ अशी ओळख असलेल्या कागल विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा "राजा विरूध्द प्रजा' लढत होण्याची शक्‍यता आहे. पुर्वी एकवेळ कै. सदाशिवराव मंडलिक विरूध्द कै. विक्रमसिंह घाटगे यांच्यात अशीच लढत झाली होती, तेच संदर्भ 2019 च्या निवडणुकीत पहायला मिळणार आहेत.
राजर्षी शाहू महाराजांचे थेट वारस कागलच्या मैदानात; मुश्रीफांविरोधात शड्डू! 

कोल्हापूर : जिल्ह्याच्या राजकारणात राजकीय विद्यापीठ अशी ओळख असलेल्या कागल विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा "राजा विरूध्द प्रजा' लढत होण्याची शक्‍यता आहे. पुर्वी एकवेळ कै. सदाशिवराव मंडलिक विरूध्द कै. विक्रमसिंह घाटगे यांच्यात अशीच लढत झाली होती, तेच संदर्भ 2019 च्या निवडणुकीत पहायला मिळणार आहेत. 

सलग चारवेळा विद्यमान आमदार हसन मुश्रीफ या मतदार संघातून विजयी झाले आहेत. श्री. मुश्रीफ यांनी विधानसभेच्या पाच निवडणुका लढवल्या, त्यात पहिल्याच निवडणुकीत ते पराभूत झाले, त्यानंतर सलग त्यांनी विजय मिळवला. या प्रत्येक निवडणुकीत त्यांचे विरोधक होते ते माजी आमदार संजय घाटगेच. श्री. घाटगे शिवसेनेचे उमेदवार असताना विजयी झाले, त्यानंतर ते एकवेळ कॉंग्रेसकडून, एकवेळ "स्वाभिमानी' च्या तर पुन्हा एकदा सेनेच्या रिंगणात उतरले, पण विजय मिळवू शकले नाहीत. 

जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रातही तशी विधानसभेची राजकीय तयारी नाही, पण कागलमध्ये मात्र आतापासूनच या निवडणुकीचा धुरळा उडवू लागला आहे. राजर्षी शाहू महाराजांचे थेट वारस व "शाहू-कागल' चे समरजितसिंह घाटगे यांनीच श्री. मुश्रीफ यांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. राज्यात 2014 मध्ये भाजपाचे सरकार आल्यानंतर श्री. घाटगे यांनी भाजपात प्रवेश केला, त्यानंतर ते "म्हाडा' चे अध्यक्षही झाले. विधानसभेसाठी कागलमधून भाजपाचे तेच उमेदवार असणार आता हे लपून राहीलेले नाही. श्री. घाटगे यांनी निवडणुकीची जय्यत तयारी केली आहे. या तयारीचा भाग म्हणून गावोगावी मेळावे, तरूणांसाठी कार्यशाळा आदि कार्यक्रम घेतले जातात, त्यातून श्री. मुश्रीफ यांच्यावर टोकाची टीका त्यांनी सुरू केली आहे. श्री. मुश्रीफ यांच्यासमोर त्यांनी चांगले आव्हान उभे केले आहे. 

श्री. घाटगे यांना प्रत्युत्तर म्हणून श्री. मुश्रीफ यांनी कंबर कसली आहे. गेल्या 40 वर्षाचा सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनुभव, त्यातून लोकांसह गावच्या विकासाची केलेली कामे या माध्यमातून लोकांना भिडण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. गेली 20 वर्षे सत्तेत असल्याने मतदरा संघाची "नस नि नस' त्यांना माहित आहे. या जोरावर त्यांच्याकडून श्री. घाटगे यांच्यावर प्रती हल्ला सुरू आहे. "प्रजा विरूध्द राजा' या लढतीत बाजी कोण मारणार यासाठी 2019 च्या विधानसभेची वाट पहावी लागणार असली तरी या मतदार संघातील राजकीय वातावरण मात्र आतापासूनच तापले आहे. 

दोन संजय महत्त्वाच्या भूमिकेत 
या तालुक्‍यात पक्षापेक्षा गटातटाच्या राजकारणाला महत्त्व आहे. तालुक्‍यातील चारपैकी कोणतेही दोन गट एकत्र आल्याशिवाय विधानसभेतील विजय सोपा नाही हे सर्वांनाच माहित आहे. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक व संजय घाटगे दोघेही शिवसेनेत आहेत, यापैकी प्रा. मंडलिक यांना राष्ट्रवादीत घेऊन खासदार करण्याचा प्रयत्न श्री. मुश्रीफ यांचा आहे, त्यातून हे दोन गट एकत्र येण्याची शक्‍यता आहे. दुसरीकडे संजय घाटगे यांना विधानपरिषदेचा "शब्द' देऊन आपल्यासोबत घेण्यासाठी समरजितसिंह घाटगे यांचे प्रयत्न सुरू आहेत. पण या दोघांकडूनही सद्यस्थितीत कशालाही प्रतिसाद नाही, त्यामुळे कागलच्या राजकारणात या दोन संजय यांचीच भुमिका महत्त्वाची ठरणार आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com