मुश्रीफ-बंटी मिळून पेटविणार "रावणाची लंका'!  - kolhapur ravnachi lanka | Politics Marathi News - Sarkarnama

मुश्रीफ-बंटी मिळून पेटविणार "रावणाची लंका'! 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 6 जून 2017

खासदार महाडीक यांच्याशी अलिकडे झालेले तीव्र मतभेद, बंटी-मुन्ना वादाची पार्श्‍वभुमी आणि लोकसभेसाठी मुश्रीफ यांनी सुरू केलेली तयारी पाहता त्यांच्या भाषणातील रावण कोण आणि कुठल्या रावणाची लंका त्यांना जाळायची आहे काही लपून राहीले नाही. बंटी-मुश्रीफ यांची गट्टी आणि रावणाची लंका याची मात्र राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. 

कोल्हापूर : खासदार धनंजय महाडीक व आमदार सतेज पाटील यांच्यातील विळ्या भोपळ्याचे वैर सर्वश्रुत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर महाडीक यांनी राष्ट्रवादीपासून घेतलेली फारकत आणि त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत त्यांची पक्षविरोधी भुमिका यामुळे त्यांचा राष्ट्रवादीचे नेते, आमदार हसन मुश्रीफ यांच्याशी खटका उडाला आहे. संधी मिळेल तिथे श्री. मुश्रीफ यांच्याकडून श्री. महाडीक यांना टोला लगावण्याचे काम सुरू आहे. अशाच एका कार्यक्रमात श्री. मुश्रीफ यांनी रावणाची लंका पेटवून त्याला गाडण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन आमदार पाटील समर्थकांना केले आहे. 

कसबा बावडा या आमदार पाटील यांच्या मूळ गावी एका संस्थेच्या कार्यक्रमाचे श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे होते. या दोघांसोबत शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्रा. संजय मंडलिक उपस्थित होते. प्रा. मंडलिक यांनी लोकसभेची निवडणूक श्री महाडीक यांच्या विरोधात लढवली होती, त्यावेळी आमदार पाटील व मुश्रीफ त्यांच्या विरोधात होते. मात्र या कार्यक्रमात हे तिघेही मांडीला मांडी लावून बसले होते. 

कसबा बावडा हा आमदार पाटील यांचा बालेकिल्ला, गावाची एकी लक्ष वेधून घेणारी. हाच संदर्भ पकडून श्री. मुश्रीफ म्हणाले,"अशी एकी असणारे गाव माझ्या मागे असते तर मी रावणाची लंका जाळून ठेवली असती.' बावड्यातील सर्व नगरसेवक हे पाटील यांचे नेतृत्त्व मानणारे असून सोसायटीही त्यांच्याच ताब्यात आहे. ही एकी अशीच ठेवा आणि रावणाला गाडा, असे आवाहनही श्री. मुश्रीफ यांनी केले पण त्यावेळी रावण मी सांगणार नाही,असा पवित्रा घेतला. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख