युती झाली तर कोल्हापुरात बंडाचा झेंडा फडकणार ?

Sena Bjp
Sena Bjp

कोल्हापूर :  राज्यातील विधानसभा निवडणुकीतील शिवसेना, भारतीय जनता पक्ष यांच्या युतीचा निर्णय लांबेल, तशी जिल्ह्यातील अनेकांची धाकधूक वाढली आहे.

जागावाटपाच्या मुद्द्यावर अडलेली ही युती झालीच तर मात्र जिल्ह्यातील अनेकांचा भ्रमनिरास होणार आहे. अशांना एक तर थांबावे लागेल किंवा बंडखोरीचा पर्याय असेल.

दरम्यान, युती किंवा आघाडी झाली तर ज्यांना संधीच मिळणार नाही, अशांनी "वंचित'शी संपर्क साधण्यास सुरवात केली आहे. त्यातून राधानगरी मतदारसंघातून "गोकुळ'चे संचालक अरुण डोंगळे, इचलकरंजीतून प्रकाश आवाडे आणि हातकणंगले व शिरोळमधून आवाडे समर्थकांनी "वंचित'मधून लढण्याची तयारीही सुरू केली आहे.

 युती झाली नाही तर श्री. आवाडे ऐन वेळी शिवसेनेचेही उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याची शक्‍यता आहे.


देशात 2014 मध्ये भाजपचे सरकार आल्यानंतर जिल्ह्यातील अनेकांनी 2019 ची विधानसभा डोळ्यांपुढे ठेवून भाजपत प्रवेश केला. 2014 प्रमाणेच शिवसेना व भाजप स्वतंत्र लढतील, हेही राजकारण यामागे होते.

पण या निवडणुकीत युती होण्याचे स्पष्ट संकेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मिळत आहेत; पण प्रत्यक्षात घोषणा मात्र लांबत चालली आहे.

पितृ पंधरवड्यानंतर ही घोषणा होणार असल्याचे सांगण्यात येते. तोपर्यंत या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे.

अशा परिस्थितीत ऐन वेळी युती तुटली आणि उमेदवारी घेण्याची वेळ आली तर करायचे काय, असा प्रश्‍न भाजपत नव्याने गेलेल्यांसमोर आहे. युती झाली तर शिवसेनेकडे सध्या असलेल्या सहाही जागा त्यांना मिळतील; पण कागल, चंदगडचा तिढा मोठा आहे.

 चंदगडपेक्षा कागलची जागा भाजपकडे आली तर माजी आमदार संजय घाटगे थांबणार का, हा प्रश्‍न आहे. चंदगडमध्ये भाजपकडून सद्यःस्थितीत राष्ट्रवादीच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या कन्या नंदिनी बाभूळकर यांचे नाव चर्चेत आहे.

युती झाली तर राधानगरीत राहुल देसाई भाजपकडून इच्छुक आहेत; पण जागा शिवसेनेला गेली तर ते काय करणार?

शिरोळमध्ये 'गोकुळ'चे अनिल यादव, 'जनसुराज्य'चे संस्थापक, माजी मंत्री विनय कोरे यांची शाहूवाडीसह हातकणंगले, करवीरमधील भूमिका काय असेल? 

कोल्हापूर उत्तरमध्ये देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव किंवा अन्य जो कोणी उमेदवार असेल ते थांबतील का? 

या सर्व प्रश्‍नांची उत्तरे युती होईल का नाही, यावर अवलंबून आहेत आणि त्यासाठी आणखी दोन-तीन दिवसांची प्रतीक्षा करावी लागेल.

आघाडीतही गोंधळच
कॉंग्रेस - राष्ट्रवादी आघाडी निश्‍चित आहे. कॉंग्रेसला सात आणि राष्ट्रवादीला तीन जागा मिळतील. पण कॉंग्रेसच्या वाट्याची शिरोळची जागा "स्वाभिमानी'ला द्यावी लागेल, त्याचवेळी या जागेची राष्ट्रवादीकडूनही मागणी होत आहे. 

मुळात कॉंग्रेसच्या वाट्याच्या सातपैकी चार जागांवर तुल्यबळ उमेदवारच नाही, अशा परिस्थितीत 'जनसुराज्य' हाच त्यांच्यासमोर पर्याय असेल. पण 'जनसुराज्य'चे श्री. कोरे यांनी आघाडीपेक्षा भाजपसोबत जाण्याला पहिली पसंती दिल्याने आघाडीतही जागावाटपापेक्षा उमेदवार निवडण्याचा गोंधळ जास्त असेल.
  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com