kolhapur politics | Sarkarnama

चंद्रकांतदादा रोज लॉलिपॉप कां दाखवतात ? : हसन मुश्रीफ 

सरकारनामा वृत्तसेवा 
बुधवार, 29 मार्च 2017

आमच्या थोड्याशा गाफीलपणामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीत आमची मॅजिक फिगर जमू शकली नाही. कित्येक वर्षे एकमेकांशी संघर्ष केलेले दोनतीन घटक सत्तारूढ गटात आहेत. त्यामुळे ही जिल्हा परिषदेची सत्ता फार काळ टिकणार नाही, अशी प्रतिक्रिया नोंदवत आमदार हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर टीका केली. 

कोल्हापूर : आमच्या थोड्याशा गाफीलपणामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीत आमची मॅजिक फिगर जमू शकली नाही. कित्येक वर्षे एकमेकांशी संघर्ष केलेले दोनतीन घटक सत्तारूढ गटात आहेत. त्यामुळे ही जिल्हा परिषदेची सत्ता फार काळ टिकणार नाही, अशी प्रतिक्रिया नोंदवत आमदार हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर टीका केली. 

जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आवश्‍यक असणारी मॅजिक फिगर का जुळू शकली नाही? या प्रश्‍नावर श्री मुश्रीफ म्हणाले, कॉंग्रेसचे प्रकाश आवाडे यांचे दोन सदस्य आहेत. आवाडे थोडेसे नाराज होतील पण कॉंग्रेसबरोबरच राहतील असा कॉंग्रेस मंडळीचा मोठा विश्‍वास होता. गेल्या पाच वर्षाच्या सत्तेच्या काळात राष्ट्रवादीला बाजूला ठेवून कॉंग्रेसने स्वाभीमानीला जवळ केले होते. त्यांना सत्तेत घेऊन बांधकाम सभापतिपद दिले होते. स्वाभीमानीचे सध्या दोन सदस्य आहेत. मागील सत्तेची जाण ठेवून स्वाभिमानी कॉंग्रेसबरोबर राहील असाही विश्‍वास वाटत होता. तो विश्‍वासही फोल ठरला. तसेच शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील यांचे दोन सदस्य आहेत. शिवसेनेने पाठिंबा दिल्यानंतर ते कॉंग्रेस मंडळीना पाठिंबा देणार होते. मात्र बहुमत होत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. अशा सहा सदस्यांमुळे आमची मॅजिक फिगर जमू शकली नाही. 

जिल्हा परिषदेतील बहुमत एकसंघ असल्याचे पालकमंत्री सांगत आहेत. पण ते रोज लॉलीपॉप का दाखवीत आहेत?. सत्तारूढ बहुमतात दोनतीन घटक असे आहेत की त्यांनी कित्येक वर्षे एकमेकांशी संघर्ष केलेला आहे. त्यामुळे ही बहुमताची सत्ता फार काळ टिकणार नाही. आम्ही फक्त विरोधकाची भूमिका निभावतोय जिल्ह्याच्या विकासकामा संदर्भात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील ज्याज्यावेळी बोलावतील त्यात्यावेळी विकासकामी सहभागी होऊ असे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवेळी कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे दोन सदस्य गैरहजर राहिले याबाबत बोलताना श्री मुश्रीफ म्हणाले, सत्तेचा वापर करुन त्यांना अनुपस्थित ठेवण्याचे काम केले गेले आहे. जिल्ह्याच्या राजकारणात आजवर असे कधीच झाले नाही असे ते म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख