kolhapur politics | Sarkarnama

पदे कमी आणि घटक पक्ष जास्त 

सरकारनामा न्यूजब्युरो 
मंगळवार, 28 मार्च 2017

जिल्हा परिषदेत भारतीय जनता पार्टीला अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत पाठिंबा दिलेल्या घटक पक्षांची संख्या जास्त आणि पदांची संख्या कमी असल्याने पहिल्या दिवसापासूनच सत्ताधारी आघाडीत नाराजीचे वातावरण दिसू लागले आहे.

कोल्हापूर : जिल्हा परिषदेत भारतीय जनता पार्टीला अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत पाठिंबा दिलेल्या घटक पक्षांची संख्या जास्त आणि पदांची संख्या कमी असल्याने पहिल्या दिवसापासूनच सत्ताधारी आघाडीत नाराजीचे वातावरण दिसू लागले आहे. ही नाराजी दूर करण्याबरोबरच सोबत आलेल्या घटक पक्षांना सांभाळताना भाजप नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. 

जिल्हा परिषदेत दोन्ही कॉंग्रेसला धोबीपछाड देत भाजपने शिवसेनेच्या व जनसुराज्यच्या प्रत्येकी सहा सदस्यांच्या जोरावर सत्ता मिळवली. जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपाचा झेंडा फडकला असला तरी पहिल्या दिवसांपासूनच घटक पक्षांची नाराजी ओढवून घेण्याची वेळ सत्ताधाऱ्यांवर आली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या कार्यालय प्रवेशावेळी यापूर्वी गटनेता म्हणून निवडलेल्या विजय भोजे यांचे नांव रद्द करून ऐनवेळी अरुण इंगवले यांच्याकडे हे पद दिले. त्यातून श्री. भोजे नाराज झाले व त्यांनी या कार्यक्रमाकडेच पाठ फिरवली. 

भाजप आघाडीला चंदगड आघाडी, आवाडे गट, आमदार सत्यजित पाटील गट व स्वाभिमानीच्या प्रत्येकी दोन सदस्यांनी पाठिंबा दिला आहे. याशिवाय शिंगणापूर गटातून विजयी झालेल्या अपक्ष रसिका पाटील यांनी ऐनवेळी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेचे दहापैकी सात सदस्यही त्यांच्यासोबत आहेत. या सर्वांना पाठिंबा देताना पद देण्याचे आश्‍वासन नेत्यांनी दिले होते. पण पद मिळणार नाही अशी कुणकूण लागल्याने चंदगड आघाडीच्या दोन सदस्यांनीही अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या कार्यालय प्रवेशाकडे पाठ फिरवली. पद दिले तर सत्ताधाऱ्यांबरोबर नाहीतर पुन्हा सवतासुभा अशी या आघाडीची भूमिका आहे. याबाबतचा निर्णय या आघाडीच्या नेत्या सौ. नंदीती बाभुळकर ह्या 30 मार्च रोजी कोल्हापुरात आल्यानंतर होणार आहे. 

शिवसेनेला उपाध्यक्षपद दिले असले तरी माजी आमदार संजय घाटगे यांनी मुलाला सभापती करण्याचा शब्द पाठिंबा देताना घेतल्याचे समजते. "जनसुराज्य', "स्वाभिमानी' ला जरूर एक पद मिळेल पण त्यातही बांधकामावरून पुन्हा या दोन घटक पक्षात मतभेदाची शक्‍यता आहे. "स्वाभिमानी' चा आग्रह हा बांधकामसाठी असेल. यापूर्वी कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादीला पाठिंबा देताना त्यांनी याच पदाचा आग्रह कायम धरला होता. आमदार सरूडकर, चंदगड आघाडी, आवाडे गट व अपक्ष हेही पद मिळावे यासाठी ठाम आहेत. हा सर्व ताळमेळ साधून नाराजी दूर करण्यात नेत्यांना किती यश येईल यावर सभापती निवडीतील चुरस अवलंबून आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख