kolhapur politics | Sarkarnama

पी. एन.- महाडीक दोस्ती कायम राहणार 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 22 मार्च 2017

अजूनही त्यांनी (बंटी यांना उद्देशून) स्वभाव व वर्तणुकीत बदल केला नाही तर त्यांचा घात होणार आहे. माझ्यामागे असलेली जनतेची कवचकुंडले भक्कम असल्याने आमचा घात करण्याचे सामर्थ्य त्यांच्यात नाही, असा टोलाही श्री. महाडीक यांनी लगावला. 

कोल्हापूर : ज्यांचा पूर्वानुभव विश्‍वासघातकी आहे, अशा लोकांवरच कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी विश्‍वास ठेवला. त्यांनाही याचा अनुभव यापूर्वी आला होता, अशा शब्दांत माजी आमदार महादेवराव महाडीक यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर नांव न घेता पुन्हा एकदा टीका केली. 

"राजाराम' वर ते पत्रकारांशी बोलत होते. मी दोस्ती जपणारा माणूस आहे. कुणालाही मी अर्ध्यावर सोडत नाही. माझे व पी. एन. यांचे सोडपत्र झालेले नाही. त्यांचे फार मोठे उपकार माझ्यावर आहेत, त्यातून उतराई होणे अशक्‍य आहे. अतिशय अडचणीच्या काळात पी. एन. यांनी मला मदत केली. महाडीक हे विसरणाऱ्यांपैकी नाही. आमच्या दोघांत वाद लावण्याचे कोणी मनातसुद्धा आणू नये. पण ते नको त्यांच्या भूलथापांना बळी पडले व त्यामुळे एका होतकरू मुलाची संधी गेली, अशी पुष्टीही त्यांनी यावेळी जोडली. 

ते म्हणाले,"या निवडणुकीत घरातील महिलांना उभे करून मला राजकारण करायचे नव्हते. पण मुलगा भाजपत, त्याची पत्नी भाजपच्या चिन्हावर निवडून आलेली. अशा परिस्थितीत पक्षानेच आमदार मुलाला पत्नीला उभे करण्याचे आदेश दिले. आमदार अमल यांनी माझ्याकडे यासाठी परवानगी मागितल्यानंतर मीही त्यासाठी सुरूवातील तयार नव्हतो. पण पालकमंत्री चंद्रकांतदादा स्वतः मला भेटले व त्यांनी गळ घातल्याने मी तयार झालो. इतर पक्षांतील नेत्यांनीही मला विनंती केली. मैत्रीपेक्षा रक्ताचे नाते मला श्रेष्ठ वाटले.' 

मी कधी बदला घेत नाही, बंटी पाटलांवर माझे फार उपकार आहेत. एकेकाळी ते माझ्या गाडीचे दार उघडायला माझ्या ऑफिसमध्ये असायचे असे सांगून ते म्हणाले,"विधानसभेच्या निवडणुकीत मोठ्या कष्टाने त्यांना मी मदत केली. त्यांनी कै. चंद्रकांत बोंद्रे यांचा पराभव केला. या निवडणुकीत करवीरमध्ये पी. एन. यांच्या जागा पाडल्या. भुदरगड, राधानगरीत के. पी., ए. वाय. यांचे उमेदवार पाडले. स्वार्थी स्वभाव व मंत्रीपदानंतरची त्यांची वर्तणूकच त्यांच्या पराभवाचे कारण ठरली.' 

ते म्हणाले,"ज्या कॉंग्रेसचे मीठ मी खाल्ले आहे, ते एवढ्या लवकर अंगातून जाणार नाही. पण पक्षांकडून माझ्यासह माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार बजरंग देसाई यांना चांगली वागणूक मिळाली नाही. जो मतदार संघ माझा होता, त्याठिकाणी मला डावलून सतेज यांना पक्षाने उमेदवारी दिली. मी त्या मतदार संघाचा विद्यमान आमदार होतो. पण या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील जनतेने पुन्हा एकदा माझ्या बाजूने कौल दिला.' 

ते म्हणाले,"ही निवडणूक जिल्ह्याचे परिवर्तन करणारी आहे. मला भाजपचा अनुभव नाही, पण त्या लोकांनी माझ्यावर विश्‍वास टाकला व मी त्या विश्‍वासाला पात्र राहिलो. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, सुरेश हाळवणकर यांनी मला उच्च कोटीची वागणूक दिली. ते दोघेही मला कधी मंत्री, पदाधिकारी असे वाटले नाहीत, कार्यकर्ता अशीच त्यांची वर्तणूक राहिली.' 

या निवडणुकीत "जनसुराज्य' चे विनय कोरे यांची लाख मोलाची मदत झाली. त्यांची ही मदत मी विसरू शकत नाही. दिलेला शब्द पाळणार, त्यासाठी किंमत मोजणारा मी माणूस आहे. या जिल्ह्यातील लोकांनी मला आमदार, पुतण्याला खासदार, मुलाला आमदार व सुनेला अध्यक्ष केले त्यांचे हे उपकार मी कधीही विसरू शकणार नाही, असेही ते म्हणाले, 

निकालानंतर गुलाल का लावून घेतला नाही या प्रश्‍नावर ते म्हणाले, "ही निवडणूक मुलांत होती, माझ्या सुनेने, एका महिलेने त्यांना त्यांची जागा दाखवली, तर मग मी कशाला गुलाल लावू. मंत्री, आमदारांपेक्षा माझे स्थान मोठे झाल्याचे वाटते, कारण काहीही नसताना लोक जे माझ्यावर प्रेम करतात त्यासाठी पदाची गरज वाटत नाही.' 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख