kolhapur ncp | Sarkarnama

खा. महाडीक...पक्षात राहायचे की नाही, ते ठरवा! 

सरकारनामा न्यूजब्युरो 
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

खासदार धनंजय महाडीक हे भारतीय जनता पार्टीच्या प्रचारात गेले असतील तर ही बाब दुर्दैवी असून त्यांनी
आता पक्षात राहायचे की नाही ही भूमिका स्पष्ट करण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडीक हे भारतीय जनता पार्टीच्या प्रचारात गेले असतील तर ही बाब दुर्दैवी असून त्यांनी
आता पक्षात राहायचे की नाही ही भूमिका स्पष्ट करण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. आता कार्यकर्तेच त्यांची ही
भूमिका सहन करणार नाहीत, असा इशाराही श्री. मुश्रीफ यांनी यावेळी दिला. 

राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या सत्कारानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले,"श्री. महाडीक यांच्या विजयासाठी दोन्ही कॉंग्रेसच्या
कार्यकर्त्यांनी हाडाची काडे आणि रक्ताचे पाणी केले. देशभर मोदी लाट असताना ते विजयी झाले. त्यात त्यांचे कर्तृत्व जरूर असेल. पण त्यानंतर झालेल्या
महापालिका निवडणुकीत ते पक्षासोबत नव्हते. आम्ही डोळेझाक केली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही त्यांच्याकडून तोच अनुभव आला. भविष्यात लोकसभेचे ते
राष्ट्रवादीचे उमेदवार असतील तर कार्यकर्ते ते मान्य करतील काय ? म्हणून त्यांनी आता भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे.' 

ते जर भाजपच्या प्रचारात गेले असतील तर ही बाब दुर्दैवी असल्याचे सांगून श्री. मुश्रीफ म्हणाले, "निवडणूक ही कार्यकर्त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्‍न असतो. पैशाचा
खेळ, अनेक उलाढाली यातून उमेदवार जात असतात. त्यातून पराभव झाला तर त्या कार्यकर्त्यांच्या काळजाच्या ठिकऱ्या उडतात. अशा परिस्थितीत त्यांच्याच
विरोधात त्यांनी विजयी केलेला खासदार जात असेल तर कार्यकर्तेही हे आता सहन करणार नाहीत.' 

ते म्हणाले,"श्री. महाडीक यांच्या खासदारकीला तीन वर्षे झाली पण आम्ही यावर काही बोललो नव्हतो. पण आता बोलण्याची वेळ आली आहे. म्हणूनच त्यांनी पक्षात
राहायचे की नाही हे स्पष्ट करावे. आम्ही यापूर्वी कधीही पक्ष नेतृत्वाकडे त्यांची तक्रार केली नव्हती. तक्रार केली असती तर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे
कार्यक्रम स्वीकारले असते का ? तक्रार करणारे आम्ही लोक नाही, मात्र त्यांनी आता त्यांच्या हिताचा जो काही निर्णय आहे तो घ्यावा.' 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख