Kolhapur MLA Ruturaj Patil Demands Help to Drought Affected Areas | Sarkarnama

अतिवृष्टीग्रस्तांना मदतीची आमदार ऋतुराज पाटील यांची विधानसभेत मागणी

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 21 डिसेंबर 2019

महापूर आणि पावसामुळे पश्‍चिम महाराष्ट्राला फार मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. शेतकरी, व्यापारी, कारागीर यांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी घरांची मोठया प्रमाणात पडझड झाली. या सर्व कामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात केली

कोल्हापूर : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे.या अतीवृष्टीचा जिल्ह्यातील आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत इमारती, अंगणवाडी इमारती तसेच पाणीपुरवठा योजनांसाठी निधी द्यावा,अशी मागणी हिवाळी अधिवेशनात आमदार ऋतुराज पाटील यांनी केली.

सार्वजनिक बांधकाम विभागातील पुरवणी मागणीवेळी बोलताना आमदार श्री. पाटील यांनी सांगीतले की, महापूर आणि पावसामुळे पश्‍चिम महाराष्ट्राला फार मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. शेतकरी, व्यापारी, कारागीर यांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी घरांची मोठया प्रमाणात पडझड झाली. या सर्व कामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी करतानाच राज्यातील नागरिक रुग्णालये तसेच ग्रामीण रुग्णालये यांच्यासाठी निधीची तरतूद करण्याची मागणीही केली. कोल्हापूर जिल्हयातील ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रांच्या सुमारे 381 इमारतींची पडझड झाली आहे. या इमारतीच्या दुरुस्तीसाठी 5 कोटी 71 लाखाचा प्रस्ताव दिला असून हा निधी देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.

आरोग्य प्रमाणेच महसूल विभागांतर्गत असलेल्या इमारतींसाठी 6 कोटी 25 लाखांची तरतूद केली आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद, तालुका पंचायत तसेच ग्रामपंचायत यांच्या 427 इमारती आणि मालमत्ता यांचे नुकसान झाले असून त्यांच्या दुरुस्ती साठी 17 कोटी 38 लाख रुपयांचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने दिला असला तरी तो अजून प्राप्त झालेला नाही. याबाबतही तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली. तसेच अंगणवाडी इमारत दुरुस्तीसाठी 19 कोटी 7 लाखांची मागणी केली आहे. शहर आणि ग्रामीण भागातील 804 पाणीपुरवठा योजनांचे नुकसान झाले आहे. त्यासाठी 63 कोटी 23 लाख रुपयांचा प्रस्ताव दिला आहे. याबाबतही तात्काळ कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख