Kolhapur Leaders and their problems | Sarkarnama

असे नेते, अशी त्यांची दुखणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मार्च 2017

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीत आमदारांसह तालुक्‍यातील नेत्यांकडून विधानसभेची जोडणी सुरू आहे. मतदारसंघातील दुखणं काय हे पाहूनच पाठिंब्याचा निर्णय घेतला जात आहे. सोयीच्या या राजकारणामुळे पक्षाच्या चिन्हावर आणि आघाडीतून निवडून आलेल्या सदस्यांना मात्र स्वतःचे असे महत्त्वच राहिलेले नाही हे दिसून येत आहे. 

कोल्हापूर: जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीत आमदारांसह तालुक्‍यातील नेत्यांकडून विधानसभेची जोडणी सुरू आहे. मतदारसंघातील दुखणं काय हे पाहूनच पाठिंब्याचा निर्णय घेतला जात आहे. सोयीच्या या राजकारणामुळे पक्षाच्या चिन्हावर आणि आघाडीतून निवडून आलेल्या सदस्यांना मात्र स्वतःचे असे महत्त्वच राहिलेले नाही हे दिसून येत आहे. 

नेत्यांची दुखणी अशी

राजू शेट्टींचा भाजपवर राग
सदाभाऊ खोत मंत्री झाल्यापासून त्यांचे व खासदार राजू शेट्टी यांच्यातील मतभेद समोर येत आहेत. याला भाजपच जबाबदार असल्याचे त्यांची भावना आहे. तसेच शिरोळ तालुक्‍यातील राजकारणाचा रंग पाहता ते कॉंग्रेससोबतच असतील असे चित्र आहे. 

सरूडकरांना "जनसुराज्य'चा राग
भाजप आघाडीसोबत "जनसुराज्य' आहे, त्यांना पद मिळाले तर विधानसभेत ते अडचणीचे ठरेल, म्हणून शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील-सरूडकर कॉंग्रेस आघाडीसोबत आहेत. 
.
उल्हास काढणार वचपा
शिरोळ पंचायत समितीत भाजपने आमदार उल्हास पाटील यांना धक्का देण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करून उपसभापती मिळवले. स्थानिक राजकारणातील बेरीज पाहता उल्हाल पाटील कॉंग्रेस आघाडीसोबत राहण्याची शक्‍यता आहे. 

आबिटकरांकडून पैरा फेडण्याची तयारी
विधानसभेच्या निवडणुकीत राधानगरी तालुक्‍यातील कॉंग्रेस कार्यकर्ते आमदार अबीटकर यांच्यासोबत राहीले. त्यातच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राधानगरीचा पुढचा आमदार भाजपचा असल्याचे सांगून त्यांची नाराजी ओढवून घेतली. त्यामुळे आबीटकर कॉंग्रेससोबत.

कुपेकरांसमोर नातेसंबंधाची अडचण
आमदार संध्यादेवी कुपेकर व आमदार अमल महाडिक हे जवळचे नातेवाईक आहेत. पक्षापेक्षा त्यांच्यासमोर नातेसंबधांची अडचण आहे. त्यातून त्यांचे दोन सदस्य भाजप आघाडीसोबत राहतील. 

आवाडेंचा राग पी. एन. यांच्यावर
कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदावरून प्रकाश आवाडे व पी. एन. यांच्यात वाद आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाकडून अन्याय झाल्याची भावना आवाडे यांची आहे. त्यातून ते उट्टे काढण्याच्या मनस्थितीत असले तरीही पक्षाच्या विरोधात त्यांनी कधीही भूमिका घेतलेली नाही. 

संजयबाबांची कोंडी
कागलच्या राजकारणात शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांनी राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्याशी हातमिळवणी केल्याने याच तालुक्‍यातील माजी आमदार संजय घाटगे यांची कोंडी झाली आहे. "सासूसाठी भांडणं केले आणि सासूच वाटणीला यावी' अशी स्थिती त्यांची झाल्याने ते भाजप आघाडीसोबत असतील. 

नरकेंना पी. एन. नकोत
करवीर विधानसभा मतदारसंघात सलग दोन निवडणुकांत पी. एन. पाटील यांच्या विरोधातच लढावे लागल्याने आमदार चंद्रदीप नरके हे त्यांच्या मुलाची अध्यक्षपदासाठीची उमेदवारी मान्य करण्याची शक्‍यताच नाही. त्यातून ते भाजप आघाडीसोबत आहेत. 

व्ही. बीं.चाही कॉंग्रेसवर राग
सुनेला कॉंग्रेसची उमेदवारी मिळावी म्हणून उद्योजक व्ही. बी. पाटील यांनी जोरदार प्रयत्न केले; पण त्यांना डावलून पी. एन. यांनी कार्यकर्त्याच्या पत्नीला संधी दिली. या रागातून व्ही. बी. यांनी स्नूषा रसिका पाटील यांना मैदानात उतरवून निवडूनही आणले, तेही हा राग सत्ता स्थापनेत व्यक्त करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख