सेनेची मते मुश्रींफांकडे वळविली काय?  संजय मंडलिकांना समरजितसिंहांचे आव्हान

''सेनेची बाकीची मते या निवडणुकीत कुठे गेली? सेनेला आज जेवढी मते मिळाली तेवढीच तुमची आहेत, की शिवसेनेची मते हसन मुश्रीफ यांच्याकडे वळविली, याचा खुलासा खासदार संजय मंडलिक यांनी करावा,'' असे आव्हान शाहू ग्रुपचे अध्यक्ष व विधानसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे.
Samarjeetsinh Ghatge - Sanjay Mandlik
Samarjeetsinh Ghatge - Sanjay Mandlik

कागल : लोकसभेच्या निवडणुकीत खासदार संजय मंडलिक यांना कागल तालुक्‍यातून 71 हजारांचे मताधिक्‍य मिळाले होते. गत विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय घाटगे यांना एक लाख 17 हजार मते मिळाली होती. या जोरावरच खासदार मंडलिक यांनी शिवसेनेची उमेदवारी संजय घाटगे यांच्यासाठी आणली; प्रत्यक्षात संजय घाटगे यांना एकंदर 55 हजार मते मिळाली आहेत. ''सेनेची बाकीची मते या निवडणुकीत कुठे गेली? सेनेला आज जेवढी मते मिळाली तेवढीच तुमची आहेत, की शिवसेनेची मते हसन मुश्रीफ यांच्याकडे वळविली, याचा खुलासा खासदार संजय मंडलिक यांनी करावा,'' असे आव्हान शाहू ग्रुपचे अध्यक्ष व विधानसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे.

घाटगे म्हणाले, "पक्षश्रेष्ठींसमोर आकडेवारीचे चित्र उभा करून आमची उमेदवारी कापली. हा पूर्व नियोजित प्लॅन असावा, हे आजच्या आकडेवारीतून स्पष्ट दिसते. यामुळे कागलमध्ये होणारे परिवर्तन थांबले. लोकसभेच्या निवडणुकीत खासदार मंडलिक यांच्या विजयासाठी युतीधर्म पाळत मी जीवाचे रान केले असताना, त्या 71 हजारांच्या मताधिक्‍यामध्ये माझे काहीच योगदान नाही काय? वेळ आली तेव्हा मला बरोबर बाहेर काढण्यात आले.''

ते पुढे म्हणाले, "विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी फक्त माझ्यावरच आरोप केले. मीच त्यांच्या प्रचाराचा मुद्दा होतो. त्या दोघांनी एकमेकांवर आरोप केलेले नाहीत, हेही जनता जाणते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत व पालिका निवडणुकीत मिळून आम्हाला 30 हजार मते मिळाली होती. आता मुश्रीफ यांच्याविरोधात एकटा लढून आम्हाला 88 हजार मते मिळाली. 60 हजारांनी आमचे मताधिक्‍य वाढले आहे. या निवडणुकीत पक्षाच्या चिन्हावर युतीकडून जे लढले, त्यामध्ये अमल महाडिक वगळता सर्व उमेदवारांना माझ्यापेक्षा कमी मते मिळाली आहेत, हे दुर्लक्षून चालणार नाही. त्यांनी गतवेळच्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला पाच हजार मते मिळाली आहेत. जागा शिवसेनेसाठी मिळविली. जर ती भाजपला सोडली असती तर आकडेवारीत निश्‍चितच बदल दिसला असता.''

"या निवडणुकीत माझ्याकडे कोणताही स्टार प्रचारक नव्हता. पक्षाचे चिन्ह नव्हते. कलम 370 किंवा मराठा आरक्षण यासारख्या मुद्यांवर मी बोलू शकत नव्हतो, तरीही जनतेने माझ्यावर विश्‍वास दाखवत मला 88 हजार मते दिली. त्याबद्दल या स्वाभिमानी जनतेचा मी मनापासून आभारी आहे. माझ्याकडून सर्वांनाच दिवाळीच्या शुभेच्छा. यापुढेही ही लढत अशीच चालू ठेवून गावागावांत कार्यकर्त्यांचे चांगले नेटवर्क उभा करुया. मुख्यमंत्री आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आशीर्वादाने मी यापुढेही जोमाने काम करीत राहीन.'', असेही ते म्हणाले.

स्पष्टीकरण आकड्यातून द्या, टीकेतून नको
"या निवडणुकीत हसन मुश्रीफ यांना गडहिंग्लजमध्ये जनता दलाचा सहारा घ्यावा लागला. बोरवडे व सिद्धनेर्ली जिल्हा परिषद मतदारसंघात मला चांगली मते मिळाली. जिल्हा परिषद कसबा सांगाव मतदारसंघात आणि मुरगूड शहरात प्रथम क्रमांकाची मते मिळाली आहेत. सेनेची मते सेनेलाच मिळाली असती तरी माझा विजय निश्‍चित होता. खासदार संजय मंडलिक यांनी या सर्व मुद्यांचे स्पष्टीकरण आकडेवारीत द्यावे, टीकेमध्ये नको,'' असे आव्हानही त्यांनी दिले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com