kolhapur guardian minister issue | Sarkarnama

म्हणून सतेज पाटलांना भंडाऱ्याला जावे लागले!

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 8 जानेवारी 2020

जिल्ह्याचे पालकमंत्री पद महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे गेल्याने जिल्ह्याच्या राजकारणातील कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील यांचा दबदबा वाढणार आहे. श्री. थोरात व पी. एन. यांचे अतिशय जवळचे संबंध आहेत. मंत्रीपद नाकारल्यानंतर नाराज झालेल्या पी. एन. यांची समजूत श्री. थोरात यांनीच काढली होती. या दोघात अतिशय सलोख्याचे संबंध असल्याचा फायदा पी. एन. गटाला होणार आहे. 
 

कोल्हापूर: कॅबिनेट मंत्री असलेल्या जिल्ह्यात राज्यमंत्र्याकडे पालकमंत्रीपद देण्यात आलेली अडचण, त्यातून ज्येष्ठतेचा निर्माण झालेला प्रश्‍न यामुळे कोल्हापुरचे पालकमंत्रीपद पुन्हा एकदा जिल्ह्याबाहेरील मंत्र्यांकडे देण्याची वेळ आली आहे. 

पश्‍चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यापैकी तीन जिल्ह्यात त्याच जिल्ह्यातील मंत्र्यांचीच पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली असताना कोल्हापुरात मात्र नगरचे आमदार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची वर्णी लागली आहे.

गेल्या 25 वर्षात चंद्रकांत पाटील यांच्या रूपाने एकमेव जिल्ह्यातील मंत्री पालकमंत्री झाले होते. हा अपवाद वगळता 1995 पासून कोल्हापुरचे पालकमंत्रीपद हे नेहमी बाहेरच्या जिल्ह्यातील मंत्र्यांकडे सोपवण्यात आले होते. ज्या पक्षाचे आमदार ज्या जिल्ह्यात जास्त त्या पक्षाच्या मंत्र्यांकडे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद असे समीकरण होते. कोल्हापूर जिल्ह्यात कॉंग्रेसचे चार तर राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या मंत्र्यांकडेच हे पद येईल अशी अपेक्षा होती पण ती फोल ठरली.

जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांची कॅबिनेट मंत्रीपद तर कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची राज्यमंत्रीपदी निवड झाली आहे. पुर्वीपासूनच श्री. पाटील हे कॉंग्रेसकडेच पालकमंत्रीपद येईल असे सांगत होते. पण त्यावेळी मंत्रीमंडळाचा विस्तार झाला नव्हता आणि जिल्ह्यातील मंत्र्यांचीही नांवे जाहीर झाली नव्हती. पालकमंत्रीपदी निवड करताना कॅबिनेट मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांच्या हाताखाली काम करायचे का ? हा ज्येष्ठतेचा प्रश्‍नही कोल्हापुरचे पालकमंत्रीपद निश्‍चित करताना पुढे आला. त्यातून जिल्ह्याबाहेरील मंत्र्यांकडे या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्याचा निर्णय झाल्याचे समजते. 

अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार जास्त असल्याने ग्रामविकास मंत्री व जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्याकडे त्या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची निवड करण्यात आली.

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अर्थमंत्री अजित पवार, साताराचे पालकमंत्री म्हणून बाळासाहेब पाटील तर सांगलीचे पालकमंत्री म्हणून जलसंपदामंत्री जयंत पाटील तर नांदेडच्या पालकमंत्री पदी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची निवड करण्यात आली. हे तिन्हीही मंत्री त्या त्या जिल्ह्यातून विजयी झाले आहेत, त्यांना त्याच जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले असताना कोल्हापुराचे पालकमंत्री पद मात्र बाहेरच्या जिल्ह्यातील मंत्र्यांना देण्यात आले.
 
आतापर्यंतचे पालकमंत्री
1995 ते 1999- रामदास कदम
1999 ते 2002 - स्वर्गीय डॉ. पतंगराव कदम
2002 ते 2014 - हर्षवर्धन पाटील
2014 ते 2019 -  चंद्रकांत पाटील
 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख