Kolhapur Gokul Politics MLA P N Patil in Trouble due to Chandrakant Patil Stand | Sarkarnama

'गोकुळ'चे राजकारण - भाजपाच्या भुमिकेमुळे पी. एन. पाटील यांची पंचाईत

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 15 जानेवारी 2020

गोकुळ' च्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. या निवडणुकीत सत्तारूढ गटाविरोधात ताकदीचे पॅनेल करण्याची व्यूहरचना गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडून आखली जात आहे. सध्या 'गोकुळ' चे नेतृत्त्व आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक करत आहेत

कोल्हापूर : जिल्ह्याचे प्रमुख अर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू असतानाच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या निवडणुकीत सत्तारूढ गटालाच पाठिंबा देऊन सत्तारूढ गटाचे नेते आमदार पी. एन. पाटील यांचीच पंचाईत केली आहे. या निवडणुकीतील भाजपाची ताकद कमी असली तरी या निर्णयाने लोकांपर्यंत मात्र चुकीचा संदेश जाण्याची भिती आहे.

'गोकुळ' च्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. या निवडणुकीत सत्तारूढ गटाविरोधात ताकदीचे पॅनेल करण्याची व्यूहरचना गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडून आखली जात आहे. सध्या 'गोकुळ' चे नेतृत्त्व आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक करत आहेत. राज्यमंत्री पाटील यांचा श्री. महाडिक यांना विरोध आहे, त्यातून त्यांनी पी. एन. यांनी 'गोकुळ' चे नेतृत्त्व करण्याचा प्रस्ताव सोडला आहे. त्याला पी. एन. यांच्याकडून फारसा प्रतिसाद नसला नाही. दुसरीकडे या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसची, त्यातही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची मदत मिळावी यासाठी स्वतः पी. एन. हे प्रयत्नशील आहेत. 

सोमवारी या संदर्भात पी. एन. हे श्री. मुश्रीफ यांची भेट घेणार होते, पण श्री. मुश्रीफ यांना भेटण्यासाठी जिल्हा बॅंकेत लोकांची गर्दी असल्याने ही भेट झाली नाही. येत्या एक-दोन दिवसांत ही भेट अपेक्षित आहे. 'गोकुळ' च्या राजकारणात पी. एन. यांचा राज्यमंत्री पाटील यांना विरोध आहे तर श्री. मुश्रीफ यांनाही श्री. महाडिक हे नको आहेत. दुसरीकडे माजी खासदार धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीतून भाजपात गेले आहेत. 'गोकुळ' च्या निवडणुकीची सुत्रेही धनंजय यांच्याकडेच आहेत. 

त्यातून काल झालेल्या भाजपाच्या मेळाव्यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या निवडणुकीत भाजपा श्री. महाडिक यांच्यासोबत असल्याचे जाहीर करून एकच खळबळ उडवून दिली आहे. एका बाजूला पी. एन. हे सतेज यांना वगळून राष्ट्रवादीच्या पाठिंब्यासाठी सक्रिय असताना प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पी. एन. यांना जोडण्या करण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

'बिद्री' त भाजपा राष्ट्रवादीसोबत

कागल तालुक्‍याती बिद्री साखर कारखान्याची निवडणूक भाजपा-राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकत्र येऊन लढवली. 'बिद्री'च्या सत्तेत भाजपा आहे, त्यामुळे 'गोकुळ" मध्ये भाजपा आमच्यासोबत आले तर काय झाले असा सूर सत्ताधाऱ्यांचा असला तरी राज्यात झालेले सत्तांतर, त्यातून महाविकास आघाडीचे सत्तेत आलेले सरकार यामुळे 'गोकुळ' मध्ये सत्ताधाऱ्यांसोबत भाजपा असणे अडचणीचे ठरू शकते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख