kolhapur congress | Sarkarnama

सत्कारातही कॉंग्रेस नेत्यांचे राजकारण 

सरकारनामा न्यूजब्युरो 
गुरुवार, 9 मार्च 2017

विधानसभा, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेत पक्षाचे मोठे नुकसान झाल्याचे काहीही सोयरसुतक कॉंग्रेसला नसल्याची प्रचिती नवनिर्वाचित सदस्यांच्या
सत्कार कार्यक्रमात आली. या कार्यक्रमाला पक्षाच्या प्रमुख नेत्यांना निमंत्रण नव्हते.

कोल्हापूर : विधानसभा, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेत पक्षाचे मोठे नुकसान झाल्याचे काहीही सोयरसुतक कॉंग्रेसला नसल्याची प्रचिती नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कार कार्यक्रमात आली. या कार्यक्रमाला पक्षाच्या प्रमुख नेत्यांना निमंत्रण नव्हते. एवढेच नव्हे तर माध्यमांपासूनही हा कार्यक्रम लपवून ठेवण्याचा प्रयत्न झाला. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कॉंग्रेसला जिल्हा परिषदेत निम्म्याही जागा मिळालेल्या नाहीत. पक्षांतर्गत नेत्यांतील गटबाजीचा मोठा फटका यावेळी पक्षाला बसला.
नेत्यांची या सुभेदारीमुळे पक्षाची सत्ता जाण्याची वेळ आली तरी नेते मात्र अजूनही हवेतच आहेत. 
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या ननिर्वाचित सदस्यांचा सत्कार कार्यक्रमाला पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनाच निमंत्रण नव्हते. कॉंग्रेसची जिल्हा परिषद, पंचायत
समितीत सत्ता पण येथील एकही नगरसेवक किंवा सदस्य कार्यक्रमाला उपस्थित नव्हते, महापालिकेत तर उपमहापौरासह स्थायी समितीचे सभापती कॉंग्रेसच्या आहेत. जिल्हा परिषदेच्या मावळत्या अध्यक्षा, उपाध्यक्ष हे कॉंग्रेसचे पण तेही कार्यक्रमाला फिरकले नाहीत. 

पक्षाचे कार्यालय स्टेशन रोडवर आहे. या कार्यालयातही हा सत्कार होऊ शकला असता पण या कार्यक्रमासाठी मंगल कार्यालय तेही अडगळीत असलेले निवडण्यात
आले. कॉंग्रेस कमिटीत हा कार्यक्रम का घेतला नाही हेही एक कोडेच आहे. कार्यक्रमात पक्षाचा एखादा फलक, दिवंगत नेत्यांचे फोटो असावेत पण हा कार्यक्रम
त्यासाठीही अपवाद ठरला. औपचारिकता म्हणूनच हा सत्कार घेतला काय ? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. जिल्हाध्यक्ष पी.एन. पाटील व आमदार सतेज पाटील
यांच्यातील अंतर्गत वादातून सत्कार समारंभाचे असे ढिसाळ नियोजन काल पहायला मिळाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख