कोल्हापूरात मटणाच्या दरवाढीवर चाकू फिरविण्याची तयारी
...
कोल्हापूर : मिश्र मटण 280 रुपये किलो व विनामिश्र मटन 450 रुपये किलोने विक्री व्हावी, अशी मागणी मटण दरवाढ विरोधी कृती समितीने केली. तर, प्रतिकिलो 560 रुपयांऐवजी 540 रुपयाने विक्री करू, अशी ग्वाही मटण विक्रेत्यांनी दिली. मात्र दोघांमध्येही सर्वमान्य तोडगा निघाला नाही. त्यामुळे, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी महापालिका आरोग्य अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापित केली.
मटण दरवाढ विरोधी कृती समिती व मटण विक्रेते संघटनांमधील प्रत्येकी पाच-पाच प्रतिनिधी आणि अन्न व औषध प्रशासनातील एक प्रतिनिधींची समिती तयार करून सोमवारपर्यंत (ता. 9) प्रतिकिलो मटणाला किती दर देता येईल हा तोडगा काढावा, अशा सूचना देवून समिती तयार केली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले,"" मटणाचा अवास्तव किंवा खूपच कमी दर असू नये. यासाठी, ग्राहकांना आणि विक्रेत्यांना परवडेल असा सर्वमान्य दर मिळाला पाहिजे. यासाठी, विरोधी आणि समर्थन करणाऱ्या कृती समितीचे प्रतिनिधींसोबत आरोग्य अधिकारी व अन्न व औषध प्रशासनाचे प्रतिनिधीही घ्यावेत. जेणे करून मटण दराबाबत काढला जाणारा तोडगा सर्वांना मान्य असेल.''
आर. के. पोवार म्हणाले, ""शहरात एक, शहर परिसरात एक आणि ग्रामीणमध्ये एक असे वेगवेगळे दर आहेत. तर शहरातील मटण विक्रेत्यांनी मिश्रमटण 280 रुपये किलो व विनामिश्र मटण 450 रुपये किलो प्रमाणे विक्री करावी.''
विजय कांबळे म्हणाले, "" शहरात चांगल्या दर्जाचे मटण विक्री होते. त्यामुळे सध्या दर जास्त आहे. पण इतर राज्यातील तुलनेत कोल्हापूरात कमी दर आहेत. दरम्यान, ग्राहकांच्या मागणीनूसार सध्या प्रतिकिलो असणारे 560 रुपये दर 540 रुपये केले जाईल.''
समिती अशी
जिल्हाधिकारी श्री देसाई यांनी नियुक्त केलेली समिती : महानगरपालिका आरोग्य अधिकारी (अध्यक्ष), मटण दरवाढ विरोधी कृतीसमिती सदस्य आर. के. पोवार, बाबा पार्टे, दुर्गेश लिंग्रस, श्री पाटील (कसबा बावडा), सुजित चव्हाण. मटण विक्रेत्यांचे सदस्य विजय कांबळे, प्रकाश प्रभावळकर, रहिम खाटीक, राजू शेळके, किरण कोथमिरे आणि अन्न व औषध प्रशासन अधिकारी.

