kolhapur bjp compete independely | Sarkarnama

कोल्हापुरात भाजपकडून स्वबळाची जोरदार तयारी

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीतील घवघवीत यशानंतर भारतीय जनता पक्षाने जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्हीही तर विधानसभेच्या सर्वच्या सर्व दहा जागा लढविण्याची तयारी सुरू केली आहे.

कोल्हापूर :  नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीतील घवघवीत यशानंतर भारतीय जनता पक्षाने जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्हीही तर विधानसभेच्या सर्वच्या सर्व दहा जागा लढविण्याची तयारी सुरू केली आहे. महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला असून तालुकानिहाय त्यांनी कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. विधानसभा मतदार संघनिहाय उमेदवारही निश्‍चित झाले आहेत.

राज्यात व देशात भाजपचे सरकार आल्यानंतर पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक 21 मे 2015 मध्ये कोल्हापुरात झाली होती. बैठकीच्या समारोपाच्या भाषणात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत भाजपचा शतप्रतीशतचा नारा दिला होता. या बैठकीनंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत पक्षाने चांगले यश मिळवले. त्यानंतर झालेल्या नगरपालिका निवडणुकीत पक्षाचे काहीही अस्तित्व नसताना जोरदार मुसंडी मारली. जिल्हा परिषदेत तर अध्यक्ष-उपाध्यक्ष पद जिंकून "कमळ' फुलविण्यात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यशस्वी झाले. हे सर्व यश मिळवत असताना श्री. पाटील यांनी परिस्थितीनुसार केलेली तडजोड व हातमिळवणी यामुळेच हे शक्‍य झाले.

पक्षाच्या या घवघवीत यशानंतर पालकमंत्री पाटील यांनी आता लोकसभा, विधानसभेच्या सर्वच जागा लढविण्याची तयारी सुरू केली आहे. मंत्रिपदाची ताकद वापरून प्रत्येक तालुक्‍यात विकासाला निधी, विविध कामांचे उद्‌घाटन, त्यानिमित्ताने दोन्ही कॉंग्रेसमधील काहींचा पक्षप्रवेश यासारख्या कार्यक्रमांचा त्यांनी धडाकाच लावला आहे. सर्वच विधानसभा मतदार संघातील पक्षाचे उमेदवारही जवळपास निश्‍चित झाले आहेत.
पाच-दहा वर्षापूर्वी शहरातील गुणे बोळापुरता मर्यादित असलेल्या या पक्षाने भल्या भल्या राजकारण्यांच्या तोंडाला पाणी सुटावे असे काम सुर केले आहे. त्यातूनच दोन्ही कॉंग्रेसमधील दिग्गज मंडळींनी भाजपत प्रवेश केला आहे. नगरपालिका, जिल्हा परिषदेत भाजपला मिळालेल्या यशाचे "आयात' उमेदवार हेही एक कारण आहे. पक्ष वाढायचा झाल्यास, त्याचा विस्तार व्हायचा झाल्यास हे सर्व करायला लागते या भावनेतून पालकमंत्री पाटील यांनी हव्या तशा तडजोडी प्रत्येक तालुक्‍यात केल्या आहेत. त्यातून राष्ट्रवादीच्या माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, आमदार संध्यादेवी कुपेकर, जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्यासारखे लोक आता भाजपासोबत आहेत.

विधानसभा मतदार संघनिहाय संभाव्य उमेदवार :
राधानगरी-भुदरगड - स्वतः चंद्रकांतदादा पाटील किंवा राहुल देसाई
कागल - समरजितसिंह घाटगे (अध्यक्ष-म्हाडा, पुणे)
करवीर - के. एस. चौगले किंवा आमदार चंद्रदीप नरके
हातकणंगले - आमदार सुजित मिणचेकर
शिरोळ - अनिल यादव
गडहिंग्लज - डॉ. सौ. नंदिती बाभूळकर
शाहूवाडी - विनय कोरे
कोल्हापूर दक्षिण - आमदार अमल महाडीक
इचलकरंजी - आमदार सुरेश हाळवणकर
कोल्हापूर उत्तर - सत्यजित कदम किंवा महेश जाधव

लोकसभेचे संभाव्य उमेदवार
हातकणंगले - राज्यमंत्री सदाभाऊ खोत
कोल्हापूर - खासदार धनंजय महाडीक
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख