घाबरण्याचे कारण काय ? म्हणत भाजपवाले राज ठाकरेंना घाबरवत आहे ? 

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना "ईडी' ने नोटीस पाठविली. या नोटिशीला ते उत्तर देतील. त्यांच्यावर कारवाई होईल किंवा नाही हा जर तरचा प्रश्‍न आहे. पण,भाजपवाले ज्या पद्धतीने घाबरण्याचे कारण काय ? असा प्रश्‍न विचारून राज यांना घाबरवत आहेत का ? की राज यांची कोणाला भीती वाटते ? हा ही प्रश्‍न आहे.
घाबरण्याचे कारण काय ? म्हणत भाजपवाले राज ठाकरेंना घाबरवत आहे ? 

महाराष्ट्राच्या राजकारणातील मुलुखमैदानी तोफ म्हणून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाहिले जाते. कोणी काही म्हणो अगदी शिवसेनेतील मंडळींनाही राज यांच्याविषयी प्रत्यक्षअप्रत्यक्ष आकर्षण आहे. राजकारणातील "अँग्री यंग मॅन' म्हणून त्यांची ओळख. त्यांचे भाषण सामान्य माणसालाही भावते.

राज यांची एकही सभा अशी नाही की जिने गर्दी खेचली नाही. त्यांच्या हल्लाबोलातून मोदी-शहाच काय शरद पवार, छगन भुजबळ यांच्यासारखे भलेभले नेतेही कधी सुटले नाहीत. 

आपल्या वक्तृत्वाने तरुणांची मने जिंकणारा त्यांच्या इतका ताकदीचा नेता सध्या तरी महाराष्ट्रात नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे त्यांच्या भाषणाला अफाट गर्दी होत असते. जनसागरच लोटतो. ही तोफ गेल्या काही महिन्यांपासून मोदी-शहांविरोधात सातत्याने धडधडताना दिसत आहे. 

भाजपवाल्यांपेक्षा कॉंग्रेसवाले बरे ! असे सांगण्यासही त्यांनी कमी केले नाही. "लाव रे तो व्हिडिओ' ने तर राज्यात धुमाकूळ घातला. लोकांचे खूप मनोरंजन झाले. पण, लोकसभेचे निकाल आल्यानंतर ही मुलुखमैदानी तोफ थंडावली. निकालच असे लागले की देशभरातील विरोधकांचे स्वप्न भंगले. ते राज यांचेही झाले. 

लोकसभेपाठोपाठ आता राज्यात विधानसभा निवडणूक येऊ घातली आहे. त्या पार्श्‍वभूमी राज यांची तोफ पुन्हा धडधडणार. ते निवडणुकीच्या मैदानात पूर्ण ताकदीनिशी उतरणार असे चित्र असताना त्यांच्यामागेही "ईडी'ची पिडा लागली. कोहिनूर मिलप्रकरणी राज यांच्यासह माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी , राजन शिरोडकर यांना "इडी'ने नोटीस पाठविली. 

राज किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी आर्थिक गैरव्यवहार केला असेल तर कायद्यानुसार त्यांच्यावर अवश्‍य कारवाई झाली पाहिजे. पण, पंधरा वर्षापूर्वी घडलेल्या या प्रकरणाची चौकशी नेमकी आताच कशी सुरू झाली ? महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले असतानाच "ईडी'ने कसे अचूक टायमिंग साधले याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 

महाराष्ट्रात आता राज ठाकरेंनी प्रचार करायचा की "ईडी'च्या चौकशीला सामोरे जात उत्तरे देत बसायचे ? त्यांना कोहिनूरच्या निमित्ताने कोणी खिंडीत गाठले हे सांगण्याची गरज नाही. या संकटातून बाहेर पडण्यासाठी त्यांची बरीच शक्ती आणि बराच काळ खर्ची पडणार आहे आणि तेच त्यांच्या विरोधकांना हवे आहे. राज यांचीही कोणाला तरी भीती वाटत असावी. विरोधकांचा बुलंद आवाजच बंद झाला तर तो कोणाला नको ? 

"ईडी'समोर जाणे म्हणजे भल्याभल्यांच्या अंगाला घाम फुटतो. त्यांची चौकशी आठ दहा तासाच्या असतात. तेथे थांबणे, रेंगाळणे या गोष्टी नेत्यांसाठी तरी सोप्या नाहीत. शेवटी "ईडी'ला काय वाटते हे सांगणे अवघड असते. 

"ईडी'तर्फे आज देशभर आणि महाराष्ट्रातही भल्याभल्या नेत्यांच्या चौकशी सुरू आहेत. छगन भुजबळ तर तुरुंगात जाऊन आले. आता राजही "ईडी'च्या रडारवर आहेत. त्यांनाही "ईडी' समोर हे जावेच लागेल. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी कितीही राणाभिमदेवी थाटात आंदोलनाच्या आणि बंदच्या घोषणा केल्या असल्या तरी त्यांनी थोडे सबुरीनेच घ्यायला हवे. तसा संदेश या पक्षाचे एक नेते बाळा नांदगावकर यांनी दिला ते बरेच झाले. 

नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावे असे एकेकाळी हेच राज ठाकरे म्हणत होते. पण, त्यांच्या लाटेत प्रादेशिक पक्ष सपाट झाल्याचे दुखणे अनेकांचे होते तेच राज यांचेही होते. जे मोदीची आरती ओवाळत होते तेच राज मोदींचे पुढे कडवे विरोधक बनले. इतकेच नव्हे जे राज कॉंग्रेसला पाण्यात पाहत होते तीच कॉंग्रेस त्यांना प्रिय वाटू लागली. 

गेल्या लोकसभेला मोदी-शहांना केलेला विरोध सर्वश्रुत आहे. भाजपवाल्यांनी राज यांना शिंगावर घेतले नाही असे नाही. पण, पतंगाला ढील ते देत राहिले. राज यांना नोटीस आल्यापासून भाजपचा प्रत्येक नेता त्यांनी घाबरण्याचे कारण काय ? कर नाही तर डर कशाला ? असे प्रश्‍न करीत आहेत. 

अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की राज यांना "ईडी' ची नोटीस आली त्याबद्दल मी अनभिज्ञ आहे. मला माध्यमातून कळले. पुढे ते असेही म्हणाले, की त्यांचा काही दोष नसेल तर त्यांना घाबरण्याचे कारण काय ? जे मुख्यमंत्री म्हणतात तेच भाजपचे नेते आणि मंत्रीही म्हणत आहेत. विनोद तावडे, सुधीरभाऊ मुनगंटीवार पासून जे जे नेते कोहिनूरच्या मुद्यावर प्रतिक्रिया देतात ते एकच शब्द बोलतात राजना घाबरण्याचे कारण काय ? 

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजपर्यंत शेकडो आंदोलने केली. मोर्चे काढले. भूमिपूत्रासाठी लढा उभारला, गुन्हे दाखल झाले. हे त्यांच्यासाठी नवे नाही. ही सर्व आंदोलने राजकीय होती. कोहिनूर प्रकरण हे व्यावसायिक होते. यात ते अडचणीत आले. 

कोहिनूरच्या व्यवहारात राज अडचणीत आले. "ईडी'च्या नोटिशीला ते उत्तर देतील. त्यांच्यावर कारवाई होईल किंवा नाही हा जर तरचा प्रश्‍न आहे. मात्र भाजपवाले ज्या पद्धतीने घाबरण्याचे कारण काय ? असे सांगून राज यांना घाबरवत आहेत का ? हा ही प्रश्‍न आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com