महाराष्ट्राची चेरापुंजीअसलेल्या किटवडेत  पडलाय  5830 मिलिमीटर पाऊस 

दरवर्षीच किटवड्यात असा पाऊस असतो. या गावाचा पावसाळ्यात संपर्क तुटला, की 10 ते 12 दिवस जगात काय चालले आहे, हे इथे कळतही नाही.
Kolha11
Kolha11

कोल्हापूर : महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आजरा तालुक्‍यातील किटवडे गावात कालपर्यंत 5830 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील एकूण पाऊस 2119.34 मिलिमीटर आहे. आजरा तालुक्‍यातील हे एकच गाव सर्वाधिक पावसाचे आहे. 

या गावाची भौगोलिक रचनाच अशी आहे, की आंबोली व कावळेसाद दरीतून या गावातच पाऊस व वाऱ्याचा झोत घुसतो व या गावाला पाऊस व वारा अक्षरशः झोडपून काढतो. गेले दहा दिवस या गावाचा संपर्क तुटला होता; पण आज पाऊस कमी झाला व अन्य जगाशी या गावाचा संपर्क झाला.

संपूर्ण गगनबावडा तालुक्‍यात 5034 मिलिमीटर म्हणजे जिल्ह्यात उच्चांकी पाऊस झाला आहे; पण फक्त किटवडे गावात 5830 मिलिमीटर पाऊस झाल्याने निसर्गाचा रुद्रावतार या गावाने याही वर्षी अनुभवला आहे. या एकाच गावात इतका अधिक म्हणजे जिल्ह्यात पडणाऱ्या एकूण पावसापेक्षा दुप्पट पाऊस पडण्यामागे या गावाची भौगोलिक रचना कारणीभूत आहे. 

आंबोलीपासून अलीकडे 11 ते 12 किलोमीटरवर किटवडे गाव आहे. मुख्य रस्त्यापासून आत सहा किलोमीटरवर असलेल्या या गावाच्या तीनही बाजूंना डोंगर आहे. एका बाजूला जो खुला भाग आहे, तेथून आंबोली व कावळेसादकडून येणारा पाऊस व वारा जोरात घुसतो व थेट या गावावरच येतो. त्यामुळे या गावात पावसाळ्यात ढगफुटीसारखा पाऊस पडतो.

 पावसाच्या जोडीला जोरदार वारा असतो. या गावावरून पुढे पावसाचा व वाऱ्याचा झोत विरळ होत जातो; पण किटवड्यात कोसळून तो पुढे जातो. त्यामुळे गावातील पावसाची सरासरी कायम इतर गावांपेक्षा जास्त असते. पावसाळ्यात तीन महिने या गावातील लोकांना घराबाहेर पडणे केवळ अशक्‍य असते.

या गावात पर्जन्यमापन केंद्र आहे. तेथे दररोज सकाळी व संध्याकाळी पावसाचे प्रमाण मोजले जाते. रामचंद्र धोडिंबा सावंत हे पर्जन्य वाचक रोज हे काम करतात. गावाच्या एका टोकाला हे पर्जन्यमापन केंद्र आहे. तुलनात्मक आढावा घेतला तर आजरा तालुक्‍यात या पावसाळ्यात काल अखेर 2733 मिलिमीटर तर जिल्ह्यात 2119 मिलिमीटर पाऊस पडला आहे आणि एकट्या किटवडे गावात 5830 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

दरवर्षीच किटवड्यात असा पाऊस असतो. या गावाचा पावसाळ्यात संपर्क तुटला, की 10 ते 12 दिवस जगात काय चालले आहे, हे इथे कळतही नाही. लोकांना पाऊस सरावाचा झाला आहे. त्यामुळे आवश्‍यक तो सर्व शिधा ते पावसाळ्यापूर्वीच घरांत साठवतात. गरोदर महिलांना ऐनवेळी काही त्रास झाला तर अडचण नको; म्हणून अन्य गावांत नातेवाइकांकडे पोहोचवतात. 

तब्येतीचा त्रास असलेलेही अन्य ग्रामस्थ नातेवाइकांकडे जातात. त्यानंतर गावातील लोक पावसाळ्यात एकमेकांना आधार देत गावात राहतात. गावाशेजारी हिरण्यकेशी नदीच्या बंधाऱ्यावरील पूर ओसरला, तर आजरा किंवा आंबोलीला जाऊन येतात. गेले दहा दिवस या गावचा अन्य जगाशी संपर्क तुटला होता; पण काल पहिल्यांदा आजऱ्याचे आरोग्य पथक गावात गेले व त्यांनी रहिवाशांना औषधे दिली.


महिना फक्त हजार रुपये!
या गावात रामचंद्र सावंत गेली 30 वर्षे पाऊस मोजण्याचे काम करतात. पावसाळ्यात चार महिने, महिना फक्त हजार रुपये. म्हणजे दिवसाला 30 ते 32 रुपये मानधनावरही ते निष्ठेने काम करतात. पुढच्या वर्षी किटवडे येथे आधुनिक पर्जन्य मोजणी केंद्र होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com