kishori peadanekar mumbai`s new mayor | Sarkarnama

आदित्य यांच्या प्रचारासाठी घेतलेली मेहनत फळाला..रश्मी ठाकरेंचाही ग्रीन सिग्नल

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

पहिल्यांदाच मुंबईच्या महापौराचा बिनविरोध निवड

मुंबई : मुंबई महापालिकेच्या इतिहासात प्रथमच महापौरपदी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर आणि उपमहापौरपदी ऍड. सुहास वाडकर यांची बिनविरोध निवड होत आहे. भाजपने ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. 

महाशिवआघाडीचा प्रयोग अधांतरी असल्याने कॉंग्रेसनेही उमेदवारी अर्ज भरला नाही. त्यामुळे दोघांच्याही विजयाचा मार्ग सोपा झाला. येत्या 22 नोव्हेंबर रोजी फक्त पेडणेकर आणि ऍड. वाडकर यांच्या निवडीची घोषणा होण्याची औपचारिकता शिल्लक आहे.

महापौरपदाच्या निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाल्यापासून ज्येष्ठ नगरसेवकांच्या नावांची महापौरपदासाठी जोरदार चर्चा सुरू होती. गेल्या काही दिवसांपासून मातोश्रीवर महापौर पदासाठी खलबते सुरू होती. काल सोमवारी दुपारी पुन्हा पालिकेतील महत्त्वाच्या नेत्यांना मातोश्रीवर बोलावण्यात आले होते. त्यात महापौर पदासाठी पेडणेकर यांचे नाव निश्‍चित झाले. पेडणेकर यांच्या उमेदवारी अर्जावर स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव आणि सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी अनुमोदक म्हणून सह्या केल्या आहेत. शिवसेनेच्या अनेक नगरसेवकांची महापौरपदासाठी चुरस होती. त्यात पेडणेकर यांनी बाजी मारली आहे.

महापौरपदाच्या निवडणुकीत यशवंत जाधव, विशाखा राऊत, मंगेश सातमकर, बाळा नर, रमाकांत रहाटे, राजूल पटेल यांची नावे चर्चेत होती. उमेदवारीसाठी खलबते सुरू असतानाच मातोश्रीवरून बोलावणे कधी येईल या प्रतीक्षेत महापालिका मुख्यालयातील शिवसेनेच्या कार्यालयात दुपारपासून शिवसेनेचे अनेक नगरसेवक ठाण मांडून होते; मात्र 5.15च्या सुमारास पालिकेत शिवसेना जिंदाबाद, आदित्य ठाकरे आगे बढो, अशा घोषणा ऐकू येताच त्यांची प्रतीक्षा संपुष्टात आली. संधी हुकल्याने इच्छुक नगरसेवकांमध्ये नाराजी दिसून आली.

आदित्य यांच्यासाठी घेतलेली मेहनत फळाला
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या विजयाच्या घोषणा देत नगरसेवकांच्या गराड्यात पेडणेकर आणि ऍड. वाडकर यांनी काल संध्याकाळी 5.20 वाजता अर्ज दाखल केले. आदित्य ठाकरे यांच्या प्रचारासाठी किशोरी पेडणेकर यांनी मोठी मेहनत घेतली होती. आदित्य ठाकरे या निवडणुकीत विजयी झाले. त्या वेळी घेतलेल्या मेहनतीचे फळ किशोरी पेडणेकर यांना महापौर पदाच्या रूपाने मिळाल्याचे बोलले जात आहे. भाजपने संख्याबळ कमी असल्याचे कारण देत निवडणूक प्रक्रियेतून माघार घेतली; तर कॉंग्रेसनेही उमेदवारी अर्ज भरला नाही. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार आहे.

सध्या असलेली पदे
- स्थायी समिती सदस्य...
- रायगड, शिर्डी जिल्हा महिला संघटक

पेडणेकर यांचा राजकीय अनुभव
2002 मध्ये मुंबई महानगर पालिकेत प्रवेश त्यानंतर
2012 प्रभाग समिती अध्यक्ष
महिला बालकल्याण समिती अध्यक्ष
2013 स्थापत्य समिती शहर अध्यक्ष
2017 सुधार समिती , स्थायी समिती सदस्य, प्रभाग समिती अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली
नगरसेवक पदाची 3 री टर्म
यापूर्वी 2 वेळा जी दक्षिण प्रभाग समिती अध्यक्षपद

- शिवसेनेच्या 'प्रथम ती' या महिला सबलीकरणाच्या उपक्रमात सहभाग

- शिवसेनेत सक्रिय झाल्यानंतर शिवसैनिक म्हणून राजकीय जबाबदारी सांभाळत नर्स म्हणून नोकरीही करत होत्या

- निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळख

- आदित्य ठाकरे आणि विशेषत: रश्‍मी ठाकरे यांच्या पाठिंब्यामुळे मातोश्रीकडून महापौरपदासाठी किशोरी पेडणेकरांना ग्रिन सिग्नल

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख