किशोर तिवारी यांचा सरकारला घरचा आहेर - Kishor Tiwari criticises state government | Politics Marathi News - Sarkarnama

किशोर तिवारी यांचा सरकारला घरचा आहेर

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 जून 2017

कर्जमाफीविषयी फडणवीस सरकारमधील काही मंत्री बेजबाबदार विधाने करीत असल्याचे राज्य सरकारच्या शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी म्हटले आहे. सध्याच्या स्थितीमुळे विदर्भ-मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील, अशी भीतीही त्यांनी अहवालात व्यक्त केली आहे. 

नागपूर : कर्जमाफीविषयी फडणवीस सरकारमधील काही मंत्री बेजबाबदार विधाने करीत असल्याचे राज्य सरकारच्या शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी म्हटले आहे. सध्याच्या स्थितीमुळे विदर्भ-मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील, अशी भीतीही त्यांनी अहवालात व्यक्त केली आहे. 

आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबविण्यासाठी राज्य सरकारने शेतकरी स्वावलंबन मिशनची स्थापन केली आहे. किशोर तिवारी यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील किशोर तिवारी यांनी 
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर आंदोलन केले होते. कॉंग्रेसचे सरकार असताना तिवारी दररोज आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची यादी वर्तमानपत्रांना पुरवित होते. 

भाजपचे सरकार आल्यानंतर तिवारी यांची मिशनच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आल्यानंतर तिवारी तसे शांत होते. त्यांची शेतकऱ्यांच्या स्थितीबद्दल इतक्‍यात कोणतेही वक्तव्य आले नव्हते. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर तिवारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविले आहे. हे निवेदन त्यांनी प्रसिद्धीस दिले आहे. यात त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील, असा इशाराही दिला आहे. विदर्भातील पीक कर्ज वाटपाला अजूनही गती मिळालेली नाही, कर्जमाफीविषयी मंत्र्यांची बेजबाबदारी विधाने व त्यामुळे शेतऱ्यांनी संभ्रमावस्थेत कर्जाची परतफेड न करणे, बॅंकांची वसुली न होणे या सर्व बाबींचा परिणाम कर्ज वितरणावर झाला असून या स्थितीमुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने सावकारांचे उंबरठे झिजवावे लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील, अशी भीती तिवारी यांनी व्यक्त केली आहे. 

संपूर्ण महाराष्ट्रात उद्दीष्टांच्या तुलनेत केवळ 14 टक्केच कर्जवाटप झाले आहे. कर्जवितरणाला वेग आणण्यासाठी प्रशासनाने आता कर्जवाटप शिबीराचे आयोजन केले आहे. परंतु त्याला बॅंकांकडून मिळत असलेले असहकार्याने विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांची स्थिती गंभीर असल्याचा अहवाल तिवारी यांनी राज्य सरकारला दिला आहे. या स्थितीला केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार नसून अधिकाऱ्यांनी संवेदनशीलता दाखविणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी पत्रकात म्हटले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख