kishor rajenimbalkar gets charge of Sarathi | Sarkarnama

एकनाथ शिंदेंनी गुप्तांना हटविले... किशोरराजे निंबाळकर आता `सारथी`चे कारभारी

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 15 जानेवारी 2020

किशोरराजे निंबाळकर हे मूळचे पुणे जिल्ह्यातील असून जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून आपला ठसा त्यांनी उमटवला होता. 

मुंबई : सारथी (छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था) संस्थेच्या कारभारातून मुख्य सचिव जे. पी. गुप्ता यांची उचलबांगडी करण्यात आली असून, "सारथी'चा कारभार मदत व पुनर्वसन सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे

सत्ता बदलानंतर गुप्ता यांनी "सारथी'च्या स्वायत्ततेवर गदा आणली होती. त्यामुळे राज्यभरातील मराठा समाजामध्ये संतापाची लाट उसळली होती. सरकारला अंधारात ठेवून मुख्य सचिव निर्णय घेत असल्याने त्यांच्या विरोधात आंदोलनेदेखील झाली होती. या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर जे. पी. गुप्ता यांची राज्य सरकारने उचलबांगडी केली असून, "सारथी'चा कारभार आता किशोरराजे निंबाळकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

मराठा, कुणबी मराठा समाजाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक उन्नती साधण्यासाठी "सारथी' या संस्थेची राज्य सरकारने स्थापना केली होती. राज्य सरकारच्या अनुदानावर चालणाऱ्या "सारथी'ला सरकारने कंपनी कायद्याअंतर्गत स्वायत्तता दिली होती. मात्र, राज्यातील सरकार बदलले आणि नवीन सरकार स्थापन होण्याआधीच मुख्य सचिवांनी "सारथी'च्या व्यवहारासंदर्भात आक्षेप नोंदवून या संस्थेची स्वायत्तता मंत्रालयाच्या अधिकारात आणण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले.

"बार्टी' या संस्थेच्या धर्तीवर "सारथी'ची स्थापना झालेली असतानाही दोन्ही संस्थांच्या बाबतीत वेगळे धोरण मंत्रालयातील प्रधान सचिवांनी स्वीकारले होते. "सारथी'मध्ये अनियमितता झाल्याचा ठपकादेखील त्यांनी ठेवला होता. याचेच कारण पुढे करत संस्थेची स्वायत्तता मंत्रालयाच्या अधिकारात आणण्याचा निर्णय गुप्ता यांनी घेतला होता.

या निर्णयाच्या विरोधात तीव्र निदर्शने आणि आंदोलने झाल्यानंतर "सारथी'ची स्वायतत्ता कायम ठेवण्याचा निर्धार राज्य सरकारने व्यक्त केला. दरम्यान, गुप्ता यांना "सारथी'च्या कारभारातून दूर करण्याची ग्वाहीदेखील राज्य सरकारच्या वतीने मंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनकर्त्यांना दिली होती. "सारथी'मध्ये आर्थिक अनियमितता झाली असेल, तर त्याचीदेखील चौकशी किशोरराजे निंबाळकर करणार आहेत. "सारथी'च्या सर्व व्यवहारांचा अहवाल ते राज्य सरकारला सादर करतील.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख