महाजन -रावलांची मध्यस्थी यशस्वी ;किसान 'लॉंग-मार्च' स्थगित 

सरकारने मागण्यांबाबत लेखी आश्‍वासन दिले आहे. तसेच, आश्‍वासनांच्या अंमलबजावणीसाठी दोन महिन्यांनी सरकार आणि किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक होईल, असा निर्णय चर्चेत झाला आहे.- जे. पी. गावित, आमदार, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष
long march halt.j
long march halt.j

नाशिक:  मुंबईत घोंघावण्यासाठी लाल वादळाने नाशिकहून कूच केली; पण कसल्याही परिस्थितीत किसान सभेचा 'लॉंग-मार्च' कसारा घाट उतरणार नाही, याची काळजी सरकारने घेतली. 

पालकमंत्री गिरीश महाजन यांनी काल (ता. 20) चर्चा केली. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यटनमंत्री जयकुमार रावलांना धाडले. महाजन आणि रावल यांची शिष्टाई यशस्वी झाली अन्‌ 13 तासांमध्ये 'लॉंग-मार्च' स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा आमदार जे. पी. गावित यांनी रात्री उशिरा केली.
  
आंबेबहुला शिवारात आंदोलनकर्ते पोचताच, सायंकाळी चारच्या सुमारास मुंबईहून रावल आणि नाशिकहून महाजन हे चर्चेसाठी पोचले. खासगी व्यावसायिकांच्या कार्यालयात महाजन, रावल, गावित, माजी आमदार नितीन भोसले, डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., डॉ. सिंगल, दराडे यांच्या उपस्थितीत मागण्यांसंबंधीची चर्चा सुरू झाली. 

चर्चेतून पुढे आलेल्या मागण्यांचा मसुदा तयार करण्यासाठी मुंबईत माहिती पाठवण्यात आली. मसुद्याचे निवेदन प्राप्त होताच त्यात काही दुरुस्त्या करण्यात आल्या. मग कार्यालयामधून महाजन, रावल आणि अधिकारी बाहेर पडले. किसान सभेचे किसन गुजर, सुनील मालुसरे आणि इतरांशी गावित यांनी चर्चा केली. अखेर रात्री साडेदहाला मोर्चा स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली.
  

"लॉंग-मार्च' नाशिकपासून पंधरा किलोमीटर दूर आल्यावर झालेल्या चर्चेतील निर्णयाची माहिती महाजन यांनी दिली. ते म्हणाले, की दमणगंगा-पिंजाळ, नार-पार नदीजोड प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. 

महाराष्ट्राला हक्काचे पाणी मिळावे म्हणून मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे प्रयत्नशील आहेत; पण तरीही नदीजोड प्रकल्पांविषयी काही समज-गैरसमज होते. त्यासंबंधाने थेंबभर पाणी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ देणार नाही याची ग्वाही देण्यात आली. मंगळवारी (ता. 26) मुंबईत किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांपुढे महाराष्ट्राच्या हक्काच्या पाण्याबद्दलचे सादरीकरण केले जाईल. 

सरकारने मागण्यांबाबत लेखी आश्‍वासन दिले आहे. तसेच, आश्‍वासनांच्या अंमलबजावणीसाठी दोन महिन्यांनी सरकार आणि किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक होईल, असा निर्णय चर्चेत झाला आहे. 
- जे. पी. गावित, आमदार, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com