Kidnapping Rate in Maharashtra High | Sarkarnama

राज्यात दररोज 30 मुलांचे अपहरण; मुलींचे प्रमाण 72 टक्के

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 16 जानेवारी 2020

लहान मुलांच्या अपहरणाचे सर्वाधिक गुन्हे उत्तर प्रदेशात नोंदवण्यात आले असून, त्यानंतर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचा क्रम लागतो. दिल्ली आणि बिहारमध्येही अशा गुन्ह्यांचे मोठे प्रमाण नोंदवण्यात आले

मुंबई : देशातील लहान मुलांच्या विरोधातील गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात दररोज 30 मुलांचे अपहरण होते; त्यापैकी 72 टक्के मुली असतात, अशी माहिती राष्ट्रीय गुन्हे अभिलेख विभागाच्या (एनसीआरबी - नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरो) 2018 मधील अहवालात देण्यात आली आहे. त्याबाबत क्राय (चिल्ड्रेन राईट्‌स अँड यू) संस्थेने चिंता व्यक्त केली आहे.

लहान मुलांच्या अपहरणाचे सर्वाधिक गुन्हे उत्तर प्रदेशात नोंदवण्यात आले असून, त्यानंतर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचा क्रम लागतो. दिल्ली आणि बिहारमध्येही अशा गुन्ह्यांचे मोठे प्रमाण नोंदवण्यात आले. 2018 मध्ये अपहरणाच्या एकूण 10 हजार 117 घटना नोंदवण्यात आल्या असून, 2017 च्या तुलनेत 15.6 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. अपहरण झालेल्या बालकांमध्ये मुलींचे प्रमाण तब्बल 72 टक्के आहे. त्यातही 16 ते 18 वर्षे वयोगटातील मुलींच्या अपहरणाचे प्रमाण सर्वाधिक आहे.

राज्यात प्रोटेक्‍शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्‍शुअल ऑफेन्सेस (पॉक्‍सो) कायद्यांतर्गत सर्वाधिक म्हणजे 6233 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. लहान मुलांच्या खुनाच्या घटनेत महाराष्ट्र राज्य देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. लहान मुलांच्या खुनाच्या घटनांत 2017 च्या तुलनेत 2018 मध्ये 23 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे.

मुलांबाबत घडणाऱ्या गुन्हेगारीचे वाढते प्रमाण धोकादायक आहे. असे गुन्हे नोंदवण्यासाठी नागरिक पुढे येत असल्याची बाब सकारात्मक आहे. अशा घटनांना बळी पडू शकणारी मुले आणि कुटुंबांची माहिती संकलित केली पाहिजे. लहान मुलांच्या संरक्षणासाठी सक्षम धोरणे आखून यंत्रणा तयार केली पाहिजे. - क्रिएन राबडी, प्रादेशिक संचालक, पश्‍चिम विभाग, क्राय.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख