khot on shetty | Sarkarnama

मला पळवून लावले : सदाभाऊ खोत 

निवास चौगले 
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

भाजपाने "स्वाभिमानी' ला आणखी एक मंत्री पद देण्याची तयारी दर्शवल्याकडे श्री. खोत यांचे लक्ष्य वेधले असता "याबाबत मला काही माहीत नाही. ज्या गावाला जायचच नाही, त्या गावचा रस्ता मी कशाला विचारू. दसरा मेळाव्यातच आपली रणनिती जाहीर करू.' असे सांगत त्यांनी थेट प्रश्‍नाला उत्तर देण्याचे टाळले.' 
 

कोल्हापूर : मी पळणारा कार्यकर्ता नाही, त्यामुळे पळून जाण्याचा प्रश्‍नच येत नाही, मला हाकलून काढले आहे, पळवून लावले आहे, असा टोला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांना लगावला. 

पळवून नेणारे अनेक जण आहेत, पण पळून जाणाऱ्यांचा हा दोष आहे, अशी टीका श्री. शेट्टी यांनी केली होती, त्याला श्री. खोत यांनी या भाषेत प्रत्युत्तर दिले. 

श्री. खोत यांनी आज माजी आमदार महादेराव महाडीक यांची कसबा बावडा येथील राजाराम साखर कारखान्यावर भेट घेतली. यावेळी "राजाराम' चे अध्यक्ष सर्जेराव माने, संचालक दिलीप पाटील, संभाजी महाडीक, माजी कार्यकारी संचालक पी. जी. मेढे आदि उपस्थित होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

श्री. खोत म्हणाले,"मी पळून गेलोच नाही. ज्यांची पात्रता नाही त्यांच्यासमोर मला चौकशीला बोलवले. मीही ताठ मानेने या चौकशीला पुढे गेलो. नंतर माझी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे पळून जाण्याचा विषयच नाही.' 

हातकणंगलेत लोकसभेसाठी मशागत सुरू आहे का ? या प्रश्‍नावर श्री. खोत म्हणाले,"मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्याला रानात घात कधी आहे, पेरणी कधी करावी हे सांगायला लागत नाही आणि हे सांगणारी शाळाही कुठे नाही. त्यामुळे योग्यवेळी कुरी खांद्यावर घेऊन पेरणीसाठी सज्ज असेन.' 

नव्या संघटनेच्या प्रतिसादाबद्दल विचारले असता ते म्हणाले,"नव्या संघटनेची घोषणा केल्यानंतर मी अनेकांशी संपर्क साधला. काहींना प्रत्यक्ष जाऊन भेटलो. अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. इचलकरंजीत संघटनेचा जो पहिला शेतकरी मेळावा असेल त्यात हा प्रतिसाद पहायला मिळेल.' 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख