शेट्टींची जनआक्रोश नव्हे स्वआक्रोश यात्रा : सदाभाऊ खोत

शेट्टींची जनआक्रोश नव्हे स्वआक्रोश यात्रा : सदाभाऊ खोत

सातारा : सातारा जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विसर्जन झाले असून सर्व पदाधिकाऱ्यांनी रयत क्रांती संघटनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता हवेत वार करण्याचे दिवस संपले, कारण आता त्यांच्याकडे लढण्यासाठी फौजच राहिलेली नाही. अकरा प्रश्‍नावरील उत्तरांसाठी राजू शेट्टींनी जनआक्रोश यात्रेचे हत्यार उपसले आहे, ती त्यांची जनआक्रोश यात्रा नसून स्व-आक्रोश यात्रा आहे, अशी टीका कृषी व पणन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर केली. दरम्यान, शेट्टींवर आता नटसम्राट नाटकातील डायलॉगप्रमाणे कोणी खासदारकी देता का खासदारकी, अशी म्हणण्याची वेळ आली आहे, अशी खिल्लीही त्यांनी उडविली. 

त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाचे काहीही देणे घेणे नाही, असे सांगून सदाभाऊ म्हणाले, राजकारणात भवितव्य टिकून राहावे, खासदारकीचा तुकडा टिकून राहावा, यासाठी त्यांनी अभद्र युती केली. पण हातकणंगलेने कौल दिला आहे. आता त्यांच्या संघटनेतील बीनीचे सर्व सरदार बाहेर पडत आहेत. आमची माणसे आमच्यावर हत्यार म्हणून सोडण्याचे काम त्यांनी केले. त्यांनी आता सरकारकडे अकरा प्रश्‍नांची उत्तरे मागितली असून ती न मिळाल्यास ते जनआक्रोश आंदोलन करणार आहेत. सरकार त्यांच्या प्रश्‍नाला उत्तर देण्यास बांधिल नाही. आम्हाला जनता प्रश्‍न विचारेल आणि आम्ही जनतेच्या प्रश्‍नाला बांधिल आहोत. हवेत वार करण्याचे दिवस संपले आहेत. कारण लढाईच्या मैदानात उतरण्यासाठी त्यांच्याकडे फौजच नाही. त्यामुळे त्यांची ही जनआक्रोश नसून स्वआक्रोश यात्रा आहे असा घणाघाती आरोपही त्यांनी केला. 

नटसम्राट नाटकातील कोणी घर देता का घर...या डायलॉगप्रमाणे त्यांच्यावर कोणी खासदारकी देता का..म्हणण्याची वेळ आली आहे. आता स्वाभिमानीच्या जिल्हाध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी रयत क्रांती संघटनेत प्रवेश केला आहे. आगामी आठवडाभरात आणखी काही जण प्रवेश करतील. ईव्हीएम मशिनवर आघाडीनेही निवडणुका जिंकल्या होत्या. मग आता बॅलेटपेपर वर निवडणुका घ्या म्हणणे म्हणजे त्यांचा रणांगणातून पळपुटेपणा आहे. त्यांनी ईव्हीएम पेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर आक्रोश करायला हवा होता. पण त्यांना आपले पद टिकायला हवे होते. त्यांनी आता सर्व विरोधी मित्रपक्ष गोळा केले आहेत. पण त्यांची अवस्था सर्व गाव मामाचे पण एक बी नाय कामाचे अशी झाली आहे. त्यांचे सर्व कार्यकर्ते देवाच्या आळंदी ऐवजी चोराच्या आळंदीला पोहोचले आहेत, अशी टीका केली. 

बॅलेट पेपरवर कॉंग्रेसने साडेचारशे जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी बॅलेटपेपरमध्ये गडबड घोटाळा होता, असे म्हणता येईल का, त्यांच्यात पराभव पचविण्याची शक्तीच राहिली नाही. ते सत्तेच्या ऊबेत होते, त्यांना ऊन माहितीच नाही, अशी टीकाही खोत यांनी कॉंग्रेसच्या नेत्यांवर केली. 

रयत क्रांतीला हव्यात 12 जागा 
रयत क्रांती संघटनेने विधानसभेसाठी 12 जागांची मागणी केली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड उत्तर, फलटण आणि माण मतदारसंघाचा समावेश आहे. येथून आमच्या पक्षातील तरूण इच्छुक आहेत, त्यांनी निवडणूक लढणे गैर नाही, असेही सदाभाऊंनी स्पष्ट केले. 

स्वाभिमानीचे प्रमुख रयत मध्ये 
स्वाभिमानीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत रयत क्रांती संघटनेत प्रवेश केला. यामध्ये स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सचिन नलावडे, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकर शिंदे, राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल घराळ, तालुकाध्यक्ष संजय साबळे, शिवाजी पाटील, अनिल बाबर, कृष्णात क्षीरसागर, राजेंद्र पाटील, रोहित पाटील, मनोज जाधव, लालासाहेब साळुंखे, विजय जगताप यांचा समावेश आहे. या सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन सदाभाऊ खोत यांनी सातारा शासकिय विश्रामगृहात स्वागत केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com