कोरे खोत यांचा अपेक्षाभंग, माने मंडलीक यांनाच शिवसेनेचे बळ

 कोरे खोत यांचा अपेक्षाभंग, माने मंडलीक यांनाच शिवसेनेचे बळ

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने आज 21 मतदार संघातील उमेदवारांची नांवे घोषित केली. त्यात कोल्हापुरातून अपेक्षेप्रमाणे प्रा. संजय मंडलिक यांची तर हातकणंगलेतून अलिकडेच शिवसेनेत दाखल झालेले धैर्यशील माने यांची उमेदवारी जाहीर झाली. दरम्यान, या मतदार संघातून ऐनवेळी कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत किंवा शिवसेना आमदार उल्हास पाटील यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा होती. 

हातकणंगले हा मतदार संघ भाजपाला घेऊन त्याठिकाणी श्री. खोत हेच उमेदवार असतील अशी चर्चा होती. "जनसुराज्य' चे माजी मंत्री विनय कोरे यांना रिंगणात उतरले जाईल असेही बोलले जात होते. पण या सर्व शक्‍यता बाजूला ठेवत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी श्री. माने यांची उमेदवारी जाहीर केल्याने श्री. खोत यांचा पत्ता कट झाला आहे. 

गेल्या निवडणुकीपासून शिवसेनेसोबतच राहिलेले प्रा. मंडलिक हे एकमेव उमेदवार आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचा शिवसेनेच्या उमेदवारीचा इतिहास बघितला तर अनेक उमेदवारांनी निकालाच्या दुसऱ्या दिवशी भगवा खाली ठेवला आहे. प्रा. मंडलिक हे पाच वर्षे सेनेसोबतच राहीले आहेत, उमेदवारी देताना ही त्यांची जमेची बाजू ठरली आहे. त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पक्षप्रमुख ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्याच्या युतीचा प्रचार शुभारंभ रविवारी (ता. 24) होत आहे. 

भाजपा-सेना युतीत हातकणंगलेची जागाही सेनेच्या वाट्याला आली आहे. याही मतदार संघातील उमेदवारीचा इतिहास हा कोल्हापूरसारखाच आहे. मुरलीधर जाधव वगळता या मतदार संघातून सेनेने आतापर्यंत उमेदवारी दिलेल्यांनी दुसऱ्या दिवशी पक्ष सोडला आहे. राष्ट्रवादीच्या माजी खासदार श्रीमती निवेदीता माने यांनीही या पक्षाकडून लोकसभा लढवली होती. आता राष्ट्रवादीतच होत असलेली घुसमट दूर करण्यासाठी त्यांनी पुत्र धैर्यशील यांच्यासह शिवसेनेत प्रवेश केला. सेनेकडून श्री. माने यांची आज उमेदवारी जाहीर झाल्याने या मतदार संघातील उलटसुलट चर्चेलाही पूर्णविराम मिळाला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com