खोपोली राष्ट्रवादीतील एक गट भाजप- शिवसेनेच्या संपर्कात  ?

येणाऱ्या विधान सभेच्या निवडणुकीपर्यंत , खोपोलीतील राष्ट्रवादीचा गड कोणत्याही स्थितीत मजबूत ठेवण्यासाठी त्यांच्या समोर मोठे आव्हान असणार आहे .
Khopoli-Municipality
Khopoli-Municipality

खोपोली : खोपोलीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक गट सत्ताधारी भाजप व शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहे . खोपोलीतील राष्ट्रवादीचे काही  नगरसेवक व वरिष्ठ पदाधिकारी भाजप शिवसेनेत जाण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत .

खोपोलीत या बाबतीत कोणताही मोठा नेता किंवा लोकप्रतिनिधी उघडपणे काहीही बोलण्यास तयार नाही .मात्र भाजप व शिवसेना सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ,  राष्ट्रवादी मधील अनेक नगरसेवक व वरिष्ठ पदाधिकारी पालक मंत्री रविंद्र चव्हाण , सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे .तर एक दुसरा गट शिवसेनेत प्रवेशासाठी खासदार श्रीरंग बारणे यांच्या मार्फत वरिष्ठ मंत्री एकनाथ शिंदे व सुभाष देसाई यांच्याशी जवळकी साधून असल्याचा जोरदार प्रचार विविध पातळ्यांवर केला जात आहे .

संभाव्य या राजकीय उलथापालथ मागील मुख्य कारण नगरपालिका मधील आर्थिक कोंडी हे सांगितले जात आहे .सत्ताधारी पक्षच्या मंत्री व वरिष्ठ नेत्यांकडून खोपोली नगरपालिकेला अतिरिक्त निधी देण्यासाठी विविध मार्गाने कोंडी केली जात असल्याची ही चर्चा नगरपालिका स्तरावर सतत होत आहे.संभाव्य राजकीय बंड व सर्व खटाटोप विविध विकास कामांसाठी मुबलक निधी मिळण्यासाठी होत असल्याचे ही बोलले जात आहे .

 मात्र चौकशी केली असता, या कारणांत कोणताही दम नसल्याचे स्पष्ट होते . दुसरीकडे येथील काही लोकप्रतिनिधी व काही वरिष्ठ नेत्यांना पक्ष प्रवेशासाठी व्यक्तिगतपणे मोठया प्रमाणावर आर्थिक लाभ मिळण्याची खात्री दिली जात आहे . त्यासाठीच्या गुप्त चर्चाही विविध पातळ्यांवर सुरू असल्याने,हेच संभाव्य पक्ष बदलाचे मुख्य कारण बनणार आहे .

राष्ट्रवादीच्या काही नगरसेवक व पदाधिकारी यांची संभाव्य पक्ष प्रवेशासाठीची अंतिम तयारी झाली आहे . उर्वरीत काही मोहरे तयार करण्याचे काम सुरू आहे . तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते व आमदार सुरेश लाड स्थितीवर लक्ष ठेवून आहेत. येणाऱ्या विधान सभेच्या निवडणुकीपर्यंत , खोपोलीतील राष्ट्रवादीचा  गड  कोणत्याही स्थितीत मजबूत ठेवण्यासाठी त्यांच्या समोर मोठे आव्हान असणार आहे .

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com