सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी पहाटे पाचला ठोठावला भावी पोलिस पाटलाचा दरवाजा!  - khed aayush prasad story | Politics Marathi News - Sarkarnama

सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी पहाटे पाचला ठोठावला भावी पोलिस पाटलाचा दरवाजा! 

महेंद्र शिंदे 
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

कडूस (खेड-पुणे): पोलीस पाटील म्हणून निवड झालेला उमेदवार गावात राहत नसल्याच्या हरकतीची शहानिशा करण्यासाठी प्रांताधिकरी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी संबंधित पोलीस पाटील उमेदवाराच्या घरी बुधवारी (ता.20) पहाटेच्या वेळी अचानक स्वतः भेट देण्याची घटना खेड तालुक्‍यात घडली. रहिवासाची खात्री करण्यासाठी एवढ्या मोठ्या हुद्द्यावरील अधिकाऱ्याने पहाटेच्या वेळी केलेल्या या "स्पॉट व्हिजिट'ची चर्चा तालुकाभर सुरू आहे. 

कडूस (खेड-पुणे): पोलीस पाटील म्हणून निवड झालेला उमेदवार गावात राहत नसल्याच्या हरकतीची शहानिशा करण्यासाठी प्रांताधिकरी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी संबंधित पोलीस पाटील उमेदवाराच्या घरी बुधवारी (ता.20) पहाटेच्या वेळी अचानक स्वतः भेट देण्याची घटना खेड तालुक्‍यात घडली. रहिवासाची खात्री करण्यासाठी एवढ्या मोठ्या हुद्द्यावरील अधिकाऱ्याने पहाटेच्या वेळी केलेल्या या "स्पॉट व्हिजिट'ची चर्चा तालुकाभर सुरू आहे. 

खेड तालुक्‍यात पोलीस पाटील पदासाठी लेखी परीक्षा आणि मुलाखतीची प्रक्रिया पार पडली आहे. निवड झालेल्या उमेदवारांची पोलीस पाटील म्हणून नियुक्ती करण्याची प्रक्रिया होत आहे. पोलीस पाटीलपदी काम करणारा इसम संबंधित गावात कायमस्वरूपी राहणारा असावा, अशी महत्वाची अट पोलीस पाटील पदासाठी आहे. याचाच आधार घेत काही उमेदवारांच्या रहिवासाबाबत खेडचे प्रांताधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे हरकती आल्या आहेत. विविध प्रकारच्या एकूण 45 हरकती प्रांताधिकारी कार्यालयात प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये पाडळी (ता.खेड) गावचे उमेदवार संदीप काशिनाथ भागडे यांच्या विरोधात गावातीलच एकाची तक्रार आली आहे. यात भागडे हे अर्जात नमूद केलेल्या ठिकाणी राहत नसल्याचे तक्रारदाराचे म्हणणे होते. भागडे हे पाडळी गावच्या पोलीस पाटील पदाच्या निवड यादीतील पहिल्या क्रमांकावरील उमेदवार आहेत. त्यात ते पोलीस पाटील पदासाठी झालेल्या लेखी परीक्षेत 80 पैकी 77 गुण मिळवून तालुक्‍यात अव्वल क्रमांकावर आहेत. लेखी परीक्षेत टॉपर असलेले पोलीस पाटील दिलेल्या पत्त्यावरच राहतात का, याची खातरजमा करण्यासाठी प्रांताधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वतः आपल्या अधिकाऱ्यांच्या टीमसह बुधवारी पहाटेच्या साडे पाच वाजता पाडळीतील भागडे यांच्या घरी प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत मुख्याधिकारी अशोक साबळे, वरिष्ठ लिपीक संदीप गडम हेही होते. 

प्रांताधिकाऱ्यांच्या या 'स्पॉट व्हिजिट'मध्ये भागडे हे त्यांनी अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावरच राहत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार भागडे राहत असलेल्या काळेचीवाडी येथील पत्त्यावर प्रांताधिकाऱ्यांची टीम पोहोचली. त्याठिकाणी भागडे यांची आई राहत असल्याचे स्पष्ट झाले. एखाद्या प्रकरणातील हरकतीवर खातरजमा करण्यासाठी एवढ्या मोठ्या हुद्द्यावरील सरकारी अधिकाऱ्याने अचानक दिलेली ही धडक भेट व ती सुध्दा पहाटेच्या साडे पाच वाजता, ही घटनाच सर्वसामान्य नागरिकांसाठी आश्‍चर्यचकीत करणारी आहे. या घटनेचे तालुक्‍यातील नागरिकांना अप्रूप वाटत आहे. या घटनेची खबर खेड तालुक्‍यात वाऱ्यासारखी पसरली आहे. या धडाकेबाज अधिकाऱ्याच्या काम करण्याच्या पद्धतीची चर्चा खेड तालुक्‍यात सुरू आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख